शिर्डी । झुंजार न्यूज
नियोजित औद्योगिक वसाहतीत सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चाच्या डिफेन्स क्लस्टरला मंजुरी मिळाली. त्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला.राहाता तालुक्याचे भूमिपुत्र गणेश निबे यांच्या कंपनीमार्फत संरक्षण मंत्रालय आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने विमानाचे सुटे भाग तयार करणाऱ्या कंपनीची घोषणा आज सामंत यांनी केली, अशी माहिती माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जाहीर केली.
हा नियोजित प्रकल्प या औद्योगिक वसाहतीमधील दोनशे एकरांवर उभारला जाईल. या नियोजित वसाहतीसाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वीच शेती महामंडळाची जमीन औद्योगिक विकास महामंडळाकडे वर्ग केली. ही जमीन विनामोबदला देण्यात आल्याने येथे उद्योग उभारू इच्छीणाऱ्या उद्योजकांना ती वाजवी दरात उपलब्ध करून देणे शक्य होईल. येत्या दहा दिवसांत या डिफेन्स क्लस्टरचा एमओयू शिडर्डी येथे साइन केला जाईल. त्यानंतर लगेचच या प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न होईल या माध्यमातून जवळपास दोन ते अडीय हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, तसेच उर्वरित औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी देखील या प्रकल्पाचा मोठा फायदा होईल.
शिर्डी औद्योगिक वसाहतीत उभारला जाणारा हा प्रकल्प रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अभिमानाची बाब अशी की राहाता तालुक्याचे सुपुत्र गणेश निबे यांचा या प्रकल्पात महत्त्वाचा सहभाग आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून उभी राहात असलेली औद्योगिक वसाहत वेगाने विकसित होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
डॉ. सुजय विखे, माजी खासदार
Post Views: 667
