संगमनेर । झुंजार न्यूज
विद्यापीठ अनुदान आयोग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संगमनेर महाविद्यालयामध्ये रॅगिंग प्रतिबंध सप्ताह नुकताच संपन्न झाला.दि. १२ ते २३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत विविध उपक्रम आणि विद्यार्थी जनजागृती च्या कार्यक्रमांद्वारे सदर सप्ताह संपन्न झाला.

सदर सप्ताहाच्या विशेष समुपदेशन व्याख्यानाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मालपाणी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल देशमुख, अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड व रॅगिंग तिबंध समिती समन्वयक डॉ. अजितकुमार कदम, डॉ. वाल्मिक मेंढकर ( रेक्टर -मुले ) , श्रीमती भाग्यश्री थोरात ( रेक्टर- मुली ) आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या प्रमुख अतिथीय समुपदेशनामध्ये डॉ. देशमुख यांनी रॅगिंग प्रतिबंध अधिनियम १९९९, रॅगिंग प्रतिबंध कायदा २००९ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत रॅगिंग प्रतिबंध विषयक कायदे, शिक्षा आणि तरतुदीचे मार्गदर्शन विद्यार्थ्याना केले. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले की, शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग प्रकारांना आळा घालण्यासाठी कायद्यातील तरतुदी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवन जगण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करतात तसेच रॅगिंग संबंधी आचारसंहिता समजते.

आपल्या अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी म्हणाले की, सदर सप्ताह काही दिवसांपुरता मर्यादित न राहता तो महाविद्यालयीन जीवनामध्ये नियमित आचरणात आणला पाहिजे. तसेच विविध जात,वंश भेद आणि उच्च, निच, सिनिअर, ज्युनिअर असा भेदभाव न करता महाविद्यालयीन जीवनात मैत्रीभाव, परस्पर प्रेम, सहकार्य वाढले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी रॅगिंगचे दुष्परिणाम व कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची रॅगिंगमुळे कशी राख रांगोळी होते याची जाणीव विद्यार्थ्यांना करुन दिली.

सदर सप्ताहांतर्गत महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम राबविले गेले त्यामध्ये प्रामुख्याने विभाग व वर्गनिहाय प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना समुपदेशन केले. रॅगिंग प्रतिबंधाविषयी विशेष निबंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रदर्शित केलेला लघुचित्रपट दाखविण्यात आला.संपन्न झालेल्या सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमादरम्यान निबंध व घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

या सप्ताह व विशेष व्याख्यान कार्यक्रम, समारोप कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थापन रॅगिंग प्रतिबंध समितीचे समन्वयक डॉ. अजितकुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली डॉ. वाल्मिक मेंढकर, श्रीमती भाग्यश्री थोरात आणि दिलीप शरमाळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. वाल्मिक मेंढकर यांनी मानले तर सुत्रसंचालन भाग्यश्री थोरात यांनी केले.

