संगमनेरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन
संगमनेर । झुंजार न्यूज
बौद्ध धर्मीयांचे महाविहार, लेण्या, दिक्षाभुमी या बौद्धांच्या ताब्यात नसून त्या विशिष्ट धर्मियांच्या ताब्यात आहे. ही सर्व बौद्ध स्थळे ही भारतीय बौद्ध महासंघ राष्ट्रीय संस्थेच्या ताब्यात देण्यात यावी, अशी मागणी उत्कर्षा रुपवते यांनी केली. दरम्यान, बौद्धगया मंदिर अधिनियम १९४९ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संगमनेरात मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

संगमनेर येथे यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भावना समोर काल मंगळवारी दुपारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्कर्षाताई रुपवते, माणिकराव यादव , चंद्रकांत पवार, राजू मुंतोडे, रामदास भालेराव, एकनाथ मेढे, अशोक गायकवाड, रवींद्र भालेराव, विशाल रुपवते, संगीता मिसाळ, शकुंतला जाधव, गौतम रोहम, संध्या खरे, सुनिता भालेराव, वैभव मोकळ आदि उपस्थित होते.

उत्कर्षा रुपवते म्हणाल्या की, अशोक सम्राट यांनी ८४ हजार स्तुप बांधले, यात अनेक बौद्ध विहार लेण्या आहेत. प्रत्येक मंदीरे त्या त्या धर्माच्या ताब्यात आहे. परंतु बौद्ध धर्माचे महाविहार लेण्या बौद्धांच्या ताब्यात नसून विशिष्ट धर्मियांच्या ताब्यात आहे.

बोधगया बिहार दीक्षाभूमी नागपूर असे अनेक बौद्ध स्थळे विशिष्ट धर्मियांच्या ताब्यात आहे, त्यामुळे बोधगया मंदिर अधिनियम १९४९ रद्द करण्यात यावा. बौद्धांची सर्व बौद्ध स्थळे ही भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय संस्थेच्या ताब्यात देण्यात यावे. परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या खुनाचा तपास करून पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागण्या केल्या.

विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयाच्या वतीने अधिकाऱ्यांनी स्विकारले. या आंदोलनात शांताराम रणशूर, संजय भालेराव, माणिक यादव, विजय जगताप, विश्वास जमधडे, विपीन गायकवाड आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 652
