मे महिन्यात मागणी वाढण्याची शक्यता ? तर जलजीवन योजना पुर्ण झाल्यास टँकरची आवश्यकता भासणार नाही
अहिल्यानगर । झुंजार न्यूज
गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तुलनेत यंदा उन्हाळ्याची दाहकता कमीच आहे. मात्र तरीही जिल्ह्यात एप्रिलमध्येच ५४ टँकरने पाणी पुरवठा सुरू करावा लागला आहे. यात सर्वाधिक १९ टँकर पारनेर, संगमनेरात १६, पाथर्डी ११ आणि नगर तालुक्यात ८ टँकर सुरू आहेत. मे महिन्यात टँकरचा हा आकडा आणखी वाढणार असल्याचे संकेत आहेत.



जलजीवन योजनेतून उन्हाळ्यात ज्या गावांना टँकर लागतात, त्या ठिकाणी प्राधान्याने योजना पूर्ण करण्याच्या शासनाकडून सूचना होत्या, असे समजते. त्यामुळे दरवर्षी टँकर लागणाऱ्या किती गावांत योजना पूर्ण झाल्या आणि योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने टैंकर यंदा बंद आहेत, याची आकडेवारी समोर आल्यानंतर योजनेचे यश आणि अपयश दिसून येणार आहे. अर्थात त्यासाठी मे महिन्याची वाट पहावी लागणार आहे.

जिल्ह्यातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने विहिरी तसेच बोअरवेल्स अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संगमनेर तालुक्यातील एक गावासाठी आणि दोन टैंकर भरण्यासाठी अशा तीन विहिरी, बोअरवेल्स अधिग्रहित केल्याचे प्रशासनाकडून समजले.

सध्या जिल्ह्यात ४६ गावे आणि २१८ वाड्या वस्त्यांवरील १ लाख नागरिकांसाठी शासकीय १५ आणि खासगी ३९ असे ५४ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. टँकरच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
