पानोडी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशी, प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अर्जुन महाराज चौधरी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत भक्ती, सदाचार, सामाजिक बांधिलकी आणि कौटुंबिक मूल्यांचे महत्त्व पटवून दिले. “वारकऱ्यांसह गावकऱ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे,” असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

 

 

Oplus_131072

या कार्यक्रमासाठी तरुण, महिला, ग्रामस्थ आणि विविध भजनी मंडळांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या सप्ताहात भजनी मंडळे आणि तरुणांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खेडकर, पवार, शेवाळे, थोरात, गायकवाड, घोडेकर, धानापूणे, वाडेकर, जेजुरकर, वाकचौरे, खंडाळे, गांधी, जंगम, सय्यद आणि अशरफी परिवारांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

 

Oplus_131072

आपल्या कीर्तनात महाराज म्हणाले की, “परमार्थ हा जीवावर आला तरी चालेल,” याचा अर्थ भक्ती आणि सदाचार हे जीवनातील कोणत्याही संकटापेक्षा श्रेष्ठ आहेत. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाचे संगोपन करते, त्याचप्रमाणे परमार्थ भक्ताचे रक्षण करतो, असे सांगत त्यांनी कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाने देवाची भक्ती करावी, असा संदेश देत. पानोडी गावाचा ‘बजरंगबलीचे गाव’ असा गौरवपूर्ण उल्लेख करत, संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचे पावित्र्य जपण्याचे आवाहन त्यांनी केले. गावकऱ्यांनी आणि वारकऱ्यांनी व्यसनांपासून दूर राहून या भूमीचा मान राखावा, असे ते म्हणाले.

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देत, जिजाऊंच्या संस्कारांमुळेच लहान वयात मावळे गोळा करून शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन केले, असे त्यांनी सांगितले. आजच्या काळात मुलांवर सुसंस्कार करणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. सध्याच्या काळात भावांमधील नातेसंबंधात विश्वास आणि जिव्हाळा कमी होत चालल्याची खंतही महाराजांनी व्यक्त केली.

 

 

चौधरी महाराजांनी समाजातील काही विचित्र स्वभावाच्या लोकांमुळे समाजाचे नुकसान होत असल्याची टीका केली. मात्र, कोरोनासारख्या संकटानंतर लोकांचा देवावरील विश्वास वाढला असल्याचे सकारात्मक निरीक्षणही त्यांनी नोंदवले. गावातील माळकरी, हरिभक्त पारायण (ह.भ.प.) आणि गायकांचा आदर करावा, कारण ते अनेक पिढ्यांच्या पुण्याईने घडलेले असतात, असेही त्यांनी नमूद केले.

सप्ताहादरम्यान अन्नदानासाठी लोकांचा वाढता सहभाग सामाजिक कार्याबद्दलची वाढती जागरूकता दर्शवतो, असे सांगत चौधरी महाराजांनी कौतुक केले. आपल्या विनोदी शैलीत त्यांनी, “लाडक्या बहिणीचा मोठा भाऊ मुख्यमंत्री झाल्याने आता पुरुषांची चुळबुळ बंद झाली आहे,” असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. एकूणच, त्यांच्या कीर्तनाने उपस्थितांना भक्ती, सदाचार आणि सामाजिक जबाबदारीची नवी प्रेरणा दिली.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *