२ मार्च २०२१ ला २३ कोटी जल शुध्दीकरण प्रकल्पाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूरी : दिवटे
संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यात महायुतीच्या आभार सभेत नवीन लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोपांना काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अपूर्ण माहितीच्या आधारे संगमनेरची बदनामी करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

हॉटेल सेलिब्रेशन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष व माजी पाणीपुरवठा सभापती सोमेश्वर दिवटे, किशोर पवार आणि नितीन अभंग यांनी नवीन लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली. त्यांनी सांगितले की, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणातून शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे आणि सध्याचा जलशुद्धीकरण प्रकल्प सुस्थितीत आहे. इतकेच नव्हे, तर भविष्यातील गरज ओळखून थोरात यांनी निळवंडे धरणालगत २३ कोटी रुपयांच्या नवीन अद्ययावत जलशुद्धीकरण प्रकल्पाला २ मार्च २०२१ रोजी मंजुरी मिळवली होती. विशेष म्हणजे, ही मंजुरी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रशासनावरील दबावामुळे अनेक विकासकामे रखडली असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. “खोटे बोल, पण रेटून बोल” अशी नवीन लोकप्रतिनिधींची अवस्था असून, जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वास दिवटे यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना दिवटे यांनी संगमनेरच्या पाणीपुरवठा योजनेचा इतिहास उलगडला. ते म्हणाले की, १९९१ पूर्वी शहरात पाण्याची भीषण टंचाई होती. नागरिकांना ८ ते १० फूट खोल खड्ड्यातून पाणी काढावे लागत होते. तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांनी प्रवरा नदीवर भूमिगत बंधारा निर्माण करून १९९२-९४ मध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला, ज्यामुळे शहराचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली.

काँग्रेस नेत्यांच्या मते, सत्तांतरानंतर काही लोकांनी जाणीवपूर्वक नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम थांबवले. शहरातील खड्डे, वाढलेला कचरा आणि अपुऱ्या सुविधांविरोधात आंदोलने करूनही सत्ताधारी प्रशासनावर दबाव टाकून कामे होऊ देत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. नगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी मंजूर झालेल्या ७ कोटी रुपयांपैकी ४.५ कोटी रुपये नव्या लोकप्रतिनिधीने म्हाळुंगी पुलासाठी वापरले, तर उर्वरित २.५ कोटी तालुक्याबाहेर पाठवल्याचा गंभीर आरोपही किशोर पवार, नितीन अभंग व सोमेश्वर दिवटे यांनी केला.
थोरात आणि तांबेंच्या नेतृत्वाखालील विकासकामे
माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांची जंत्रीच या पत्रकार परिषदेत मांडण्यात आली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांचा पाठपुरावा, एमआयडीसीमधील १५५ उद्योगांतून ६५०० जणांना रोजगार आणि विस्तारित एमआयडीसीसाठी सुरू असलेले प्रयत्न यांचा समावेश आहे. तसेच, नाशिक-पुणे रेल्वे संगमनेरमधूनच जावी, यासाठी बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांचा सातत्याने आग्रह सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
गेल्या आठ महिन्यांत संगमनेर शहरात दहशत वाढली असून, बाजारपेठ ठप्प झाली आहे आणि अस्थिरता वाढली आहे, असा आरोपही करण्यात आला. विकासकामे करण्याऐवजी “चाळीस वर्षांत काय केले?” असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र, तालुक्याबाहेर गेल्यावर हेच लोक संगमनेरच्या प्रगतीचे गोडवे गातात, असेही ते म्हणाले.

एकंदरीत, महायुतीच्या आभार सभेनंतर संगमनेरमधील राजकीय वातावरण तापले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Post Views: 595
