संगमनेर । झुंजार न्यूज
एकेकाळी दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्याने दूध व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती साधली असून, आज तालुक्यात दररोज तब्बल नऊ लाख लिटर दुधाचे उत्पादन होत आहे. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या ४८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या यशाचे कौतुक केले. दूध व्यवसायाने शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला असून, सहकार व ग्रामीण अर्थव्यवस्थेमुळे बाजारपेठेत समृद्धी आल्याचे ते म्हणाले.
राजहंस दूध संघाचे वैशिष्ट्य: गुणवत्तापूर्ण दूध व उपपदार्थ
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राजहंस दूध संघाचे गुणवत्तापूर्ण दूध आणि उपपदार्थ हे वैशिष्ट्य असल्याचे गौरवोद्गार काढले. दूध हे लेकरा-बाळांच्या मुखात जात असल्याने त्याची गुणवत्ता जपण्याची काळजी तालुक्यात घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदाची दिवाळी गोड होणार
संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी यावर्षी दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी सांगितले की, दूध संघाने यावर्षी १२ कोटी ५१ लाख लिटर दुधाचे संकलन केले असून, शेतकऱ्यांकडून ४०४ कोटी रुपयांचे दूध खरेदी केले आहे. संघाची आर्थिक उलाढाल ५५१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून, तालुक्याच्या आर्थिक विकासात या संस्थेचा मोठा वाटा आहे.
सहकारी संस्थांचा आधार
थोरात यांनी सहकारी दूध संघांमुळे खाजगी संघांवर अंकुश राहत असल्याचे सांगितले, ज्यामुळे त्यांना मनमानी करता येत नाही. पनीरसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या भेसळीवरही त्यांनी चिंता व्यक्त केली आणि ग्राहकांनी खरेदी करताना गुणवत्ता तपासून घेण्याचे आवाहन केले. दुधामध्ये बिटवेल, विटामिन आणि कॅल्शियम असल्याने ते शरीरासाठी आवश्यक असून, मुलाबाळांना दूध देण्यावर भर देण्यास त्यांनी सांगितले.
भाकड जनावरांचा प्रश्न आणि पुढील वाटचाल
भाकड गाईंच्या वाढत्या प्रश्नावर थोरात यांनी सरकार लक्ष घालण्याची गरज असल्याचे म्हटले. आगामी काळात कमी गाईंमध्ये जास्त दूध उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, तालुक्यात बदललेल्या राजकीय वातावरणावरही त्यांनी चिंता व्यक्त केली आणि सर्वांनी आत्मपरीक्षण करून तालुक्याची सामाजिक व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी जागृत राहण्याचे आवाहन केले.
नेतृत्व आणि विकासाची दिशा
आमदार सत्यजित तांबे यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघ आणि इतर सहकारी संस्था दिशादर्शक ठरत असल्याचे सांगितले. दूध व्यवसायात अस्थिरता असूनही राजहंस दूध संघ राज्यात प्रथम क्रमांकावर असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दूध पोहोचवत असल्याचे ते म्हणाले.

नवीन प्रकल्प आणि भविष्यातील योजना
रणजितसिंह देशमुख यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दूध संघाने एमडीएफ गोठा, मुरघास यांसारखे प्रकल्प राबवले असून, त्यांचे राज्यात अनुकरण केले जात असल्याचे सांगितले. यावर्षी दूध संघात सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा मानस असून, ‘मिशन ५० लिटर’ अंतर्गत दूध उत्पादक गाई वाढवण्यासाठी काम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. गोहत्या बंदीमुळे निर्माण झालेल्या भाकड जनावरांच्या प्रश्नावर सरकारने तातडीने पर्याय व्यवस्था करावी आणि शेतकरी व दूध उत्पादकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी व्यासपीठावर मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पाटील खेमनर, ॲड माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, दूध उत्पादक शेतकरी आणि दूध सोसायट्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर यांनी केले, तर प्रास्ताविक चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले. कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी नोटीस वाचन केले, नामदेव कहांडळ व सुरेश जोंधळे यांनी सूत्रसंचालन केले आणि संतोष मांडेकर यांनी आभार मानले.




