66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
संगमनेर । झुंजार न्यूज
तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरता मागील पिढीने शेतकी संघासह सहकारी संस्था उभ्या केल्या. काटकसर हे आपल्या शेतकी संघाचे वैशिष्ट्य राहिले असून राज्यातील अनेक शेतकी संघ मोडकळीस आले आहे. अशा परिस्थितीत संगमनेरचा शेतकी संघ भक्कमपणे उभे असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले असून शेतकी संघाची 66 वर्षांची वाटचाल ही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संगमनेर तालुका शेतकी सहकारी संघाच्या 66 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन संपतराव डोंगरे हे होते. तर व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पा.खेमनर, ॲड.माधवराव कानवडे, सौ.दुर्गाताई तांबे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, सभापती शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, पांडुरंग पाटील घुले,रामहरी कातोरे, राजेंद्र कडलग, लक्ष्मणराव कुटे, व्हाईस चेअरमन सुनील कडलग, संचालक साहेबराव बारवे, बाळकृष्ण होडगर, किरण नवले, भाऊसाहेब नवले, संतोष नागरे,सुखदेव आहेर, तुकाराम कोठवळ,सचिन दिघे,प्रभाकर सोनवणे, महादू खेमनर,संजय क्षीरसागर, भास्कर गोपाळे, विनायक काळे,सौ.मंगल ठाकरे, सौ.प्रभावती ढोकरे,मॅनेजर अनिल थोरात, कार्यालय अधीक्षक बी.एन.काळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, मागील पिढीने सहकाराचा पाया घातला. त्यामधून तालुक्यात समृद्धी निर्माण झाली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून बाजार समिती व शेतकी संघाची कल्पना पुढे आली. ती संगमनेर तालुक्यात तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी राबवली. राज्यामध्ये अनेक शेतकी संघ मोडकळीस आले असताना संगमनेरचा शेतकी संघ मात्र दिमाखात उभा आहे. काटकसर, पारदर्शकता ही शेतकी संघाचे वैशिष्ट्य आहे. सुरुवातीला औषधे आडच स्पेअर पार्ट या बाबी शेतकऱ्यांना पुरवल्या जायच्या परंतु आता दुकानांची संख्या वाढली आहे. पेट्रोल हे एकमेव उत्पादनाचे साधन आहे. गुणवत्ता पूर्ण पेट्रोल असल्याने नागरिकांची मोठी मागणी शेतकी संघाच्या पेट्रोलला आहे. बदलत्या काळाबरोबर आपल्याला काही बदल करावे लागणार आहेत. सर्व सहकारी संस्था सुरळीतपणे सुरू आहेत परंतु मागील एक वर्षापासून अडचणी निर्माण करण्याचे काम सुरू झाले आहे.सहकार टिकवण्यासाठी जपण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले असून शेतकी संघाची वाटचाल ही कौतुकास्पद राहिली असल्याचे ते म्हणाले.
तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका ही संगमनेरची ओळख सहकारामुळे झाली आहे. तालुक्यातील सेवा सोसायटी समृद्ध आहे. सहकार ही आपली ताकद असून त्यामुळे ग्रामीण विकास झाला आहे. बाजारपेठ फुलली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील सहकाराचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा करताना शेतकी संघ उत्तमपणे काम करत असल्याचे ते म्हणाले.
तर संपतराव डोंगरे म्हणाले की, अनेक अडचणींमधून मार्ग काढत शेतकी संघाने आपला लौकिक टिकवला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला धोरणात्मक निर्णय घ्यावे लागणे असून शेतकी संघाच्या या वाटचालीमध्ये संपूर्ण संचालक मंडळ व अधिकारी कर्मचारी या सर्वांचे योगदान असल्याचे ते म्हणाले.
सभेचे स्वागत सचिन दिघे यांनी केले या सभेच्या नोटीस चे वाचन मॅनेजर अनिल थोरात यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हाईस चेअरमन सुनील कडलग यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर तालुक्यातील विविध सेवा सोसायटीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




