पाथर्डी । झुंजार न्यूज

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या करंजी गावात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकरी व स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे करंजी परिसरात हाहाकार उडाला असून, अनेक घरांची पडझड झाली आहे, तर शेतीचेही अतोनात नुकसान झाले आहे.

या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने करंजी गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी पावसामुळे बाधित झालेल्या भागांची प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान, नामदार विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी आत्मीयतेने संवाद साधला. त्यांनी नागरिकांचे दुःख जाणून घेत त्यांना धीर दिला आणि या कठीण प्रसंगात शासन त्यांच्यासोबत असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना पालकमंत्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी शासन कटिबंध असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “या नैसर्गिक आपत्तीत आम्ही तुमच्यासोबत आहोत. शासनाकडून तुम्हाला सर्वतोपरी मदत केली जाईल.” त्यांनी तातडीने प्रशासनाला स्थायी आदेशानुसार नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित मदत देण्याचे निर्देश दिले.

यासोबतच, ज्या नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे, त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून त्यांच्या निवार्याची व इतर आवश्यक गरजांची पूर्तता करण्याचे आदेशही त्यांनी दिले. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना नुकसानीची सविस्तर माहिती दिली आणि तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आश्वासन दिले.

 

 

करंजी गावातील नागरिकांनी पालकमंत्र्यांच्या भेटीमुळे आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे काही अंशी दिलासा व्यक्त केला आहे. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *