संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अखेर मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीनंतर लगेचच निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, संगमनेर तालुक्यात एका वेगळ्याच समीकरणाने राजकीय घडामोडींना वेग दिला आहे.

 

संगमनेर पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित: रिपब्लिकन कार्यकर्त्यांना संधी

 

संगमनेर पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाल्याने अनेक मातब्बर इच्छुकांना धक्का बसला आहे. यामुळे त्यांची काही प्रमाणात हिरमोमोड झाली असली, तरी अनेक वर्षांनंतर अनुसूचित जातीला ही संधी मिळाल्याने या वर्गातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. विशेषतः, महायुतीचा महत्त्वाचा घटक असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. तालुक्यातील सर्व राखीव जागा आपल्या पक्षाच्या वाट्याला याव्यात यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आता सर्वांचे लक्ष १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या गट-गण आरक्षण सोडतीकडे लागले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे

विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. इच्छुकांनी आपली दावेदारी प्रस्थापित करण्यासाठी कंबर कसली आहे. खादीचे शुभ्र कपडे परिधान करून, आपणच योग्य उमेदवार असल्याचे ते मतदारांना भासवत आहेत. चहाच्या टपऱ्यांपासून ते गावातील चौकांपर्यंत, सर्वत्र राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अमोल खताळ विरुद्ध बाळासाहेब थोरात: पुन्हा एकदा राजकीय सामना

मागील विधानसभा निवडणुकीत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. नवखे उमेदवार अमोल खताळ यांनी विखे पाटील पिता-पुत्रांच्या मदतीने थोरातांना पराभूत करत विधानसभेत प्रवेश केला होता. आता पंचायत समिती निवडणुकीतही आपल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी अमोल खताळ सज्ज झाले आहेत.

 

 

दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बाळासाहेब थोरात पूर्णपणे सावध झाले आहेत. कोणताही धोका पत्करण्यास ते तयार नाहीत. गनिमी काव्याने पुन्हा एकदा पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी त्यांनी तयारी केली असून, कार्यकर्त्यांनाही तसे स्पष्ट आदेश दिले आहेत.

 

पुढील काही दिवसांतच थोरात, तांबे की विखे, खताळ यांच्यापैकी कोण बाजी मारणार हे स्पष्ट होईल. त्यामुळे संगमनेरच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एक राजकीय संघर्ष अनुभवण्याची शक्यता आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed