संगमनेर । झुंझार न्यूज

 संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, यंदा नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्याने शहरात पुन्हा एकदा ‘महिलाराज’ पाहायला मिळणार आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या या नगरपालिकेवर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. मात्र, विधानसभेतील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यावेळी सत्तेचा खेळ पालटण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ज्यामुळे ही निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे.

 

बदलती राजकीय समीकरणे

 

काँग्रेसने थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिकेत आपली सत्ता सातत्याने राखली असली, तरी आता विधानसभेत झालेल्या घडामोडींमुळे परिस्थिती बदलली आहे. आ. अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने आपले राजकीय बस्तान घट्ट केले आहे. खुद्द आ. खताळ यांनीच निवडणुकीची सूत्रे हाती घेऊन प्रभागनिहाय दौरे सुरू केले आहेत. दुसरीकडे, शहर विकास आघाडीची रणनीती आ. सत्यजित तांबे यांच्या हाती आहे. यामुळे थोरात गट आणि तांबे गट यांच्यातील समन्वय कसा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

आरक्षणामुळे राजकीय वातावरण तापले

आरक्षण जाहीर होताच संगमनेरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक १, ५, ८, ११, १३ हे महिलांसाठी आरक्षित झाल्याने मागासवर्ग, अनुसूचित जाती आणि खुल्या प्रवर्गातील महिलांना यावेळी मोठी संधी मिळाली आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांनी नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या असून, काही ठिकाणी गटबाजीचे चित्रही स्पष्टपणे दिसत आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांकडे अर्जांचा पाऊस पडत आहे. नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाल्याने दोन्ही आघाड्यांमध्ये चुरस वाढली आहे.

प्रमुख दावेदार कोण?

महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी पत्रकार स्मिता गुणे, रेखा गलांडे, उषा नावंदर, सुषमा तवरेज आणि भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे या नावांची जोरदार चर्चा आहे. तर शहर विकास आघाडीकडून माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आणि आ. सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे या दोघींच्या नावावर चर्चा सुरू आहे. या महिला उमेदवारांच्या स्पर्धेमुळे संगमनेरमधील राजकारण अधिक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट आहे.

 

 

प्रतिष्ठेची लढाई

 

यंदा थेट महायुतीविरुद्ध शहर विकास आघाडी असा सामना रंगणार आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती मैदानात उतरणार आहे, तर माजीमंत्री थोरात आणि आ. तांबे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडी सज्ज झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही बाजूंसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

 

 

Oplus_131072

नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने अनेक नवीन चेहरे राजकारणात दिसणार आहेत. काँग्रेस आपली परंपरागत सत्ता कायम राखते की महायुती नवीन इतिहास रचते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. संगमनेरच्या सुज्ञ मतदारांनी यापूर्वीही विचारपूर्वक मतदान केले आहे आणि यावेळीही तेच अपेक्षित आहे

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed