आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरमध्ये शुक्रवारी रात्री बिबट्याने मानवी वस्तीत घुसून धुमाकूळ घातला. मध्यरात्री दोनच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात बांधकाम कामगार बाळासाहेब निवृत्ती कदम यांच्या दोन गाभण शेळ्या बिबट्याने ठार मारून फस्त केल्या. या घटनेमुळे संपूर्ण गावात प्रचंड दहशत निर्माण झाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गेल्या काही काळापासून आश्वी बुद्रुक परिसरातील शेतवस्त्यांवर बिबट्याचे हल्ले नित्याचे झाले आहेत. मात्र, आता बिबट्याने थेट मानवी वस्तीत शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरमध्ये सुमारे दीडशे ते दोनशे लोक राहतात. याच वस्तीत राहणारे बाळासाहेब कदम यांच्या घराशेजारी बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यात कदम यांचे सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सुदैवाने, गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याने अण्णाभाऊ साठे नगर तसेच शेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आणि गारुडी वस्तीत घराबाहेर कोणीही झोपले नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. तथापि, या घटनेने आश्वी बुद्रुक गावात दहशतीसोबतच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले पथदिवे ग्रामपंचायतीने त्वरित सुरू करावेत, अशी मागणी रामदास साळवे, बाळासाहेब कदम, संतोष साळवे, राजेंद्र कदम, शिवा कदम, गुलाब साळवे, रवी साळवे, सोनू साळवे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांनी वनविभागाला या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून भविष्यात असे अनुचित प्रकार टाळता येतील आणि ग्रामस्थ भयमुक्त जीवन जगू शकतील.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *