पुणे । झुंझार न्यूज

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कष्टकऱ्यांचे आधारवड डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एका नेत्याचा अंत झाला नसून चळवळीच्या पातळीवर मोठी हानी झाली आहे,” अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. बाबा आढाव यांच्या निधनानंतर थोरात यांनी त्यांना आदरांजली वाहताना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 

बाबा आढाव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बाळासाहेब थोरात कालच (रविवार) पुण्यातील रुग्णालयात गेले होते. या भेटीचा उल्लेख करताना ते भावुक झाले. “कालच त्यांना भेटून आलो होतो, पण आज त्यांच्या निधनाची बातमी आली, हे मनाला चटका लावणारे आहे,” असे थोरात यांनी म्हटले.


बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विद्यार्थी दशेत बाबा आढाव यांच्याशी आलेल्या संपर्काचा उल्लेख केला. ते म्हणाले, “पुण्यातील माझ्या शैक्षणिक कालखंडामध्ये हमाल पंचायतमध्ये होणाऱ्या काही बैठकांना मी उपस्थित राहिलो होतो. त्या वेळी बाबांचे विचार आणि त्यांची कार्यपद्धती जवळून पाहता आली, त्या माझ्यासाठी अमूल्य आठवणी आहेत.

बाबा आढाव यांच्या व्यापक कार्याचा गौरव करताना थोरात म्हणाले की, लोकशाहीचे रक्षण, श्रमिक आणि कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. ‘एक गाव – एक पाणवठा’सारख्या त्यांच्या चळवळी सामाजिक समतेचा ठाम आग्रह धरणाऱ्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, आणीबाणीविरोधी संघर्ष, महागाई विरोधातील आंदोलन ते नामांतराचा लढा आणि अलीकडील अण्णा हजारेंच्या आंदोलनापर्यंत त्यांनी नेहमीच सक्रिय भूमिका बजावली. या संघर्षांमध्ये त्यांना अनेकदा तुरुंगवासही सोसावा लागला.

कष्टकऱ्यांचे अर्थकारण आणि संस्थात्मक उभारणी
केवळ रस्त्यावरची आंदोलने करून बाबा थांबले नाहीत, तर कष्टकरी वर्गाचे जीवन सुसह्य करण्यासाठी त्यांनी संस्थात्मक कार्यही उभे केले. हमाल-मापाडी आणि कष्टकऱ्यांसाठी त्यांनी पतपेढ्या स्थापन केल्या आणि त्या यशस्वीपणे टिकवून ठेवल्या. श्रमिकांचे प्रश्न शासनदरबारी पोहोचवून त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले, असे थोरात यांनी नमूद केले.

बाबा आढाव यांच्या लढवय्या वृत्तीचे कौतुक करताना थोरात म्हणाले, “शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा स्वभाव लढवय्या आणि विचार समाजवादी राहिला. वयाच्या ९३ व्या वर्षीही ईव्हीएमविरोधात (EVM) आंदोलन करणारे बाबा आढाव हे संघर्षाचे जिवंत प्रतीक होते.”

त्यांनी दिलेला विचार आणि मूल्ये पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगत बाळासाहेब थोरात यांनी बाबा आढाव यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *