गावकऱ्यांच्या शेकडो तक्रारींकडे काणाडोळा; वाळू माफियांकडून नदीपात्राची चाळण
रहिमपूर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथे सध्या अवैध वाळू उपशाने कहर केला आहे. येथील नदीपात्रात दिवसाढवळ्या आणि रात्रभर ‘फरांडी’च्या (पाण्यातून वाळू उपसणारे यांत्रिक साधन) साहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे. विशेष म्हणजे, गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही महसूल प्रशासन याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे .

रहिमपूर हे वाळू तस्करांचे नंदनवन बनले आहे. स्थानिक वाळू माफियांनी आधुनिक तंत्राचा वापर करत नदीपात्रात फरांडी उतरवल्या आहेत. या फरांडीच्या साहाय्याने नदीच्या तळाशी असलेली वाळू ओरबाडून काढली जात आहे. यामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले असून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. दिवस-रात्र डंपर आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने या वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे, ज्यामुळे गावातील रस्त्यांचीही दुर्दशा झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. रहिमपूरमधील सतर्क नागरिक आणि शेतकऱ्यांनी याबाबत तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसील कार्यालयात अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. वाळू उपशाचे फोटो आणि व्हिडिओ पुराव्यासह देऊनही अधिकारी घटनास्थळी फिरकत नाहीत. जेव्हा अधिकारी येतात, तेव्हा वाळू माफिया आधीच गायब झालेले असतात. त्यामुळे वाळू माफिया आणि महसूल प्रशासन यांच्यात ‘साटेलोटे’ असल्याची जोरदार चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.
बेसुमार वाळू उपशामुळे नदीकाठच्या विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. तसेच वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे वाळू तस्करांचे मनोबल वाढले असून ते तक्रारदारांना धमकावत असल्याचे प्रकारही समोर येत आहेत.
महसूल विभाग कुणाच्या दबावाखाली काम करत आहे? डोळ्यासमोर वाळू चोरी होत असताना अधिकारी गप्प का?” असा सवाल रहिमपूरचे ग्रामस्थ विचारत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून संबंधित दोषी अधिकारी आणि वाळू माफियांवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

रहिमपूरमध्ये फरांडी लावून अहोरात्र वाळू उपसा.
महसूल प्रशासनाकडून तक्रारींची दखल नाही.
नदीपात्राचे व पर्यावरणाचे मोठे नुकसान.
स्थानिक प्रशासनावर मिलीभगत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप



