बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या सिद्धेश कडलगच्या कुटुंबियांची भेट

 



संगमनेर । झुंझार न्यूज

 

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मयत झालेल्या लहानग्या सिद्धेश सुरज कडलग यांच्या कुटुंबीयांची माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी भेट घेऊन सांत्वन केले याचबरोबर कडलग कुटुंबीयांना शासकीय मदतीबरोबर तालुक्यातील बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्या अशा सूचना वन विभागाला दिल्या.

जवळेकडलग येथील सुरज कडलग यांच्या निवासस्थानी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली. यावेळी समवेत रामहरी कातोरे, चंद्रकांत कडलक, गुलाबराव देशमुख, विष्णुपंत रहाटळ, आनंद वरपे योगेश देशमुख यांच्यासह वन विभागाचे व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सिद्धेश चा मृत्यू झाल्यानंतर कडलग कुटुंबीय व सर्व नातेवाईक यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रशासना विरोधात अत्यंत तीव्र रोष व्यक्त केला यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल अत्यंत नाराजी व्यक्त केली. याचवेळी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना फोन करून बिबट्यांचे हल्ले रोखण्याकरता ठोस उपाययोजना कराव्यात व नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली यानंतर शासनाने तातडीने त्या नरभक्षत बिबट्याला ठार मारण्याचे आदेश निर्गमित केले. यानंतर आमदार सत्यजित तांबे व डॉ जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

जवळेकडलक येथे बोलताना माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या आणि पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये विशेषता अहिल्यानगर जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये बिबट्यांची संख्या वाढली आहे. हे बिबट्या आता मानवी वस्तीमध्ये घुसत आहेत. अनेक ठिकाणी माणसांवर हल्ले झाले आहेत तर अनेकांचे जीव गेले आहेत. यावर ठोस उपाय योजना गरजेचे आहे. वन विभागाचे अधिकारी बिबट्या पकडतात आणि अगदी जवळ सोडतात त्यामुळे ते बिबट्या पुन्हा त्याच भागांमध्ये येतात. तर शासनाने नव्याने एक कोटी शेळ्या बिबट्यांकरता जंगलामध्ये सोडण्याचा विचार सुरू केला आहे हे अत्यंत हास्यास्पद आहे अगोदर माणसाला अभय द्या मग प्राण्यांना द्या अशी मागणी करताना शेळ्या सोडण्याच्या उपक्रमामध्ये मोठा भ्रष्टाचार होऊ शकतो असेही ते म्हणाले.

शासनाने याबाबत अत्यंत प्रभावीपणे उपाययोजना करताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. बिबट्या प्रमाण क्षेत्रामध्ये पिंजऱ्यांची संख्या वाढवावी. नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी द्यावी. तसेच मृत झालेल्या बालक किंवा व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासनाकडून भरघोस मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली याचबरोबर कडलग कुटुंबीयांना 25 लाख रुपये शासनाच्या वतीने मिळून देण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी अप्पर सचिव मिलिंद म्हैसकर यांना फोन करून तातडीने या कुटुंबीयांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी गावातील ग्रामस्थ नागरिक व कडलग कुटुंबीयांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *