आश्वी । झुंझार न्यूज

 

शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारी ती एक निरंतर प्रक्रिया आहे. याच उद्देशाने संगमनेर तालुक्यातील प्रवरा शिक्षण संस्थेच्या प्रवरा माध्यमिक विद्यालय, पिंपरी लौकी (अजमपूर) येथे ‘बाल आनंद मेळाव्या’चे अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यावहारिक जगाचे धडे गिरवत आपल्यातील सर्जनशीलतेचे दर्शन घडवले.

या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल्स लावले होते. यात शेतातील ताजा भाजीपाला, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू आणि चविष्ट खाद्यपदार्थांचा समावेश होता. गावातील ग्रामस्थ आणि महिलांनी या मेळाव्याला भेट देऊन विद्यार्थ्यांकडून खरेदी केली. स्वतः पिकवलेला माल विकताना आणि व्यवहार करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आणि आनंद पाहायला मिळाला.

व्यावहारिक ज्ञानाची शिदोरी: भारतराव पाटील गिते

सामाजिक कार्यकर्ते भारतराव पाटील गिते यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “अल्पवयातच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आणि प्रपंचिक समज मिळावी, हा या मेळाव्याचा मुख्य हेतू आहे. मुले आपल्या आई-वडिलांकडून शेती आणि व्यवसायाचे जे धडे घेतात, त्याचे प्रतिबिंब या मेळाव्यात उमटले आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रपंच, व्यापार, शिक्षण आणि आरोग्य अशा सर्वच क्षेत्रांत काम करण्याची जिद्द निर्माण होते.

कौशल्य विकासाचा प्रभावी मंच: प्रा. कान्हु गिते

सेवानिवृत्त प्राध्यापक कान्हु गिते यांनी सांगितले की, “आनंद मेळावा हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाचा तो एक प्रभावी मंच आहे. बदलत्या काळातील शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि सर्जनशीलता विकसित करणे आवश्यक आहे .


संस्कारक्षम नागरिक घडवण्याचे केंद्र: मुख्याध्यापक तायगा शिंदे

विद्यालयाचे मुख्याध्यापक तायगा शिंदे यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, शालेय शिक्षण हे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाशी जोडणे काळाची गरज आहे. आनंद मेळाव्यासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो, ज्यातून उद्याचे सक्षम आणि जबाबदार नागरिक घडतात.

या प्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब मुंढे, ज्येष्ठ सदस्य भाऊसाहेब लावरे, सेवानिवृत्त प्राचार्य अशोकराव गिते, महादेव भिवराज गिते, लक्ष्मण गिते, संतोष गिते यांसह स्थानिक सल्लागार समितीचे पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी पावडे सर यांनी सर्वांचे आभार मानले. शिस्त आणि उत्साह यांच्या संगमामुळे हा आनंद मेळावा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *