महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न मालदाड (ता. संगमनेर) येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी आपल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाची सुरुवात एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाने केली आहे. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे दाखल झालेल्या या विद्यार्थिनींनी रांगोळीच्या माध्यमातून गावाचा संपूर्ण नकाशा रेखाटून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी उद्योजकता कार्यक्रमांतर्गत या कृषीकन्यांनी जवळे कडलग गावात ‘रिसोर्स मॅपिंग’ (संसाधन नकाशा) तयार केला. यामध्ये केवळ गावाच्या सीमाच नव्हे, तर गावाची लोकसंख्या, साक्षरता प्रमाण, सामाजिक संसाधने, पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि गतिशीलता यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींची माहिती रांगोळी आणि नकाशाच्या माध्यमातून गावकऱ्यांना दिली. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना आपल्या गावाची भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती एका दृष्टिक्षेपात पाहता आली.
हा कार्यक्रम पुढील दहा आठवडे चालणार आहे. या कालावधीत कृषीकन्या गावातच मुक्कामी राहून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत. यामध्ये माती परीक्षण, बीजप्रक्रिया, पीक संरक्षण, सेंद्रिय शेती आणि शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश हापसे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रम समन्वयक एन. पी. तायडे, प्रा. बी. डी. तायडे, डॉ. गणेश साकोरे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. के. आर. शिंदे यांच्यासह विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थिनींना मिळत आहे.
या उपक्रमात कृषीकन्या अनिशा देवेंद्र वाळके, तनुजा कुशाबा मधे, पुजा निंबा बुळे, प्रियंका बाबुराव काळे, संस्कृती विलास खैरनार आणि गितांजली रावसाहेब गायकवाड यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी जवळे कडलग परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषीकन्यांनी रांगोळीतून साकारलेल्या या नकाशाचे आणि त्यांच्या उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.