संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. आपल्या मातृसंस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
पानोडी येथील या जिल्हा परिषद शाळेने आजवर हजारो विद्यार्थी घडवले आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवलेले हे विद्यार्थी आज देश-विदेशात विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. या शाळेतून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी आज नामांकित डॉक्टर, वकील, इंजिनीअर, प्रशासकीय अधिकारी तसेच विविध औद्योगिक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. त्याचप्रमाणे अनेक माजी विद्यार्थ्यांनी राजकारण आणि समाजकारणात सक्रिय सहभाग नोंदवत सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक म्हणून नाव कमावले आहे. हे सर्व दिग्गज एकाच छताखाली येणार असल्याने या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या स्नेहमेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ जुन्या मित्रांच्या भेटीगाठी घेणे एवढ्यापुरताच हा कार्यक्रम मर्यादित राहणार नाही. “ज्या शाळेने आपल्याला घडवले, त्या शाळेला काळाच्या पावलावर पाऊल ठेवून आधुनिक बनवणे” हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही खासगी शाळांच्या तोडीचे शिक्षण मिळावे, यासाठी या शाळेला ‘तंत्रज्ञानयुक्त’ (Digital & Tech-savvy) बनविण्याचा संकल्प या मेळाव्यात केला जाणार आहे.
स्नेह मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट करताना आयोजक म्हणाले की, “जेव्हा माजी विद्यार्थी एकत्र येऊन शाळेच्या प्रगतीसाठी योगदान देतील, तेव्हाच या मेळाव्याचे खरे उद्दिष्ट साध्य होईल. शाळेत आधुनिक संगणक लॅब, ई-लर्निंग सुविधा आणि डिजिटल क्लासरूम उभारण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
या स्नेहमेळाव्याला पानोडी परिसरातील आणि बाहेरगावी स्थायिक झालेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या निमित्ताने होणारा हा उपक्रम तालुक्यातील इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.