झरेकाठी । झुंझार न्यूज

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून झरेकाठी (ता. संगमनेर) येथे विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि महिला बचत गटांना वृक्षारोपण व बँकिंग मार्गदर्शनाद्वारे हा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. समृद्धी रोहित पाटील होत्या. व्यासपीठावर ह.भ.प. दत्तगिरी महाराज, पद्मश्री कारखान्याचे माजी संचालक पोपटराव वाणी, माजी उपसरपंच शिवाजी वाकचौरे, सरपंच सतीश जोशी, सरपंच अशोक वाणी, नारायण काहार, विलासराव वाणी, प्रा. बाबासाहेब वाणी, सुजयदादा विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक दीपक सोनवणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व महिलांना आंबा रोपांचे वाटप

जनसेवा फाउंडेशन, लोणी यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ‘चला वाचूया झटपट’ या अंकलिपीचे वाटप करण्यात आले. शालेय वयातच वाचन आणि गणिताची गोडी निर्माण व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच, पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी गावातील महिला बचत गटांना कलमी केशर आंबा रोपांचे वाटप करण्यात आले.


बँकेच्या वतीने ३० विद्यार्थिनींचे सुकन्या खाते उघडणार

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखा अधिकारी सौ. मनीषा नवले यांनी महिला बचत गटांना बँकिंग कामकाजाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी एक कौतुकास्पद घोषणा केली. “मी स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिकून क्लास वन अधिकारी झाले आहे, याचा मला अभिमान आहे,” असे सांगत त्यांनी शाळेतील प्रथम ३० विद्यार्थिनींच्या ‘सुकन्या समृद्धी योजने’ची ठेव रक्कम स्वतः भरण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रीयकृत बँकांच्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


जिल्हा परिषद शाळांमधूनच घडतात आदर्श नागरिक : दत्तगिरी महाराज

कार्यक्रमात बोलताना ह.भ.प. दत्तगिरी महाराज यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषणांचे आणि शिस्तीचे विशेष कौतुक केले. “जिल्हा परिषद शाळेतच आदर्श आणि सुसंस्कृत नागरिक घडतात. पालकांनी आपल्या पाल्यांना आवर्जून जिल्हा परिषद शाळेत प्रवेश द्यावा,” असे आवाहन त्यांनी केले. शिक्षकांच्या मेहनतीचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

जनसेवा युवा मंचचा पुढाकार

यावेळी जनसेवा युवा मंचच्या वतीने शाळेतील सांस्कृतिक स्पर्धेत यश मिळवलेल्या विजेत्यांना ५०० रुपयांचे सामूहिक बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसेवा युवा मंचच्या सर्व सदस्यांनी व शाळा व्यवस्थापन समितीने विशेष परिश्रम घेतले.

या प्रसंगी तुषार वाणी, श्रीकांत दाभाडे, राहुल वाणी, जालिंदर वाणी, सेवा सोसायटी अध्यक्ष जिजाभाऊ वाणी, माजी उपसरपंच गोकुळ वाणी, सोमनाथ डोळे, ऋषिकेश वाघमारे, रमेश डोळे, स्वप्निल पाटील, सुहास वाणी, भीमराज बुधे, मनोज मेहेर, सुनंदा वाणी, पुष्पा वाणी, नंदा वाणी, मंदा वाणी, वैशाली घोलप, अर्चना वाणी, द्रोपदा वाणी, वनिता व्यवहारे, शितल डोळे, कोमल म्हंकाळे, वैशाली यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि महिला बचत गटाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ डोळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राहुल वाणी यांनी मानले.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed