पानोडी जिल्हा परिषद शाळेत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शाळेच्या दुरुस्तीसाठी उद्योजक महेश जाधव यांच्याकडून १ लाखांची मदत

पानोडी । झुंझार न्यूज

जिल्हा परिषद शाळा हे केवळ शिक्षणाचे माध्यम नसून ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे. याच शाळेने समाजाला सुजाण आणि कर्तव्यदक्ष नागरिक दिले आहेत. आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रगती होत असली, तरी ज्या शाळेने आपल्याला घडवले, त्या शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने मदतीचा ‘खारीचा वाटा’ उचलणे ही काळाची गरज आहे,” असे भावनिक प्रतिपादन माजी शिक्षिका सौ. शकुंतला नागरे यांनी केले.

 

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’त त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र विठ्ठल जाधव हे होते.

यावेळी बोलताना माजी विद्यार्थी भगवानराव थोरात यांनी शाळेच्या इतिहासाला उजाळा दिला. १९०६ मध्ये स्थापन झालेल्या आणि १९६० मध्ये इमारत बांधलेल्या या ऐतिहासिक शाळेने अनेक पिढ्या घडवल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आज याच शाळेच्या इमारतीवर झाडे उगवली असून, वेळीच लक्ष न दिल्यास ही वास्तू नामशेष होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. १९५३ च्या काळातील आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की, “आम्ही शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसून शिक्षण घेतले, आता मात्र शाळा आधुनिक होणे गरजेचे आहे.


शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी गोडसे यांनी प्रास्ताविकात कुसुमाग्रजांच्या कवितेचा आधार घेत गुरु-शिष्यांच्या अतुट नात्यावर प्रकाश टाकला. शाळेचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक असून विद्यार्थी विविध कलागुणांत नैपुण्य मिळवत आहेत. मात्र, शाळेच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती, सुरक्षिततेसाठी कंपाऊंड वॉल, डिजिटल क्लासरूम आणि शिष्यवृत्तीसाठी लोकसहभागाची आवश्यकता असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले .

शाळेची दुरवस्था पाहून उद्योजक महेश जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत तत्काळ १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच, शाळेच्या दोन खोल्यांची दुरुस्ती स्वतः करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर उपसरपंच विक्रम थोरात यांनी शासकीय निधीच्या अभावावर खंत व्यक्त केली, मात्र “गाव म्हणून आपण एकसंध राहून शाळेचा कायापालट करू,” असा विश्वास दिला.

मेळाव्याचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांनी ‘संदेशे आते है’ या गाण्यावर आकर्षक लेझीम नृत्य सादर केले. विशेषतः लहान मुलींनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांतून प्रभावी भाषणे केली. त्यांची ही प्रगती पाहून उपस्थित पालकांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी कौतुक केले.

शिक्षक गणेश गाढेकर व जगन्नाथ जाधव यांनी १९६० ते २०१० या ५० वर्षांतील विद्यार्थ्यांना एकत्र करून शिक्षणाप्रती जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. “शाळेच्या भिंती थकल्या आहेत, आता सुविधा देऊन विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणे हाच गावाचा स्वाभिमान आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास सरपंच गणपत हजारे, उपसंरपच विक्रम थोरात , सोसायटी चेअरमन बबनराव कराड ,भगवानराव थोरात, माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब चव्हाण, ॲड. सदाशिवराव थोरात, रावसाहेब घुगे, अशोकराव तळेकर, अलिम सय्यद, कैलासराव कराड, राजेंद्र जाधव, पत्रकार राजेश गायकवाड, ॲड. बाळासाहेब चव्हाण, महादू खेडकर, जय कदम, संतोष चव्हाण, गणेश कदम, सोमनाथ खेडकर, प्रवीण कदम, दिनकर कदम, रोहिणी त्रिभुवन, प्रविण खेडकर , भारत शेवाळे, आलम सय्यद, कुमार धराडी, गणेश गाढेकर यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Oplus_131072

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल म्हस्के यांनी केले, तर अशोक तळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *