संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

शाळांमधील विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देणे चुकीचे असून कोणत्याही परिस्थितीत त्याला समर्थन देता येणार नाही. मात्र वर्गातील शिस्त सांभाळताना शिक्षकांवर एकतर्फी कारवाई होऊ नये, तसेच त्यांच्या भूमिकेचाही गांभीयनि विचार केला गेला पाहिजे, असे स्पष्ट आणि ठाम मत पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.

Oplus_131072

संगमनेर यशोधन कार्यालय येथे शिक्षण या विषयावर माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना मा. आमदार डॉ तांबे म्हणाले की, शालेय शिक्षण विभागाकडून “विद्यार्थ्यांना रागावले, ओरडले किंवा शिक्षा केली तर थेट नोकरी गमावावी लागेल” अशा स्वरूपाचे निर्बंध घालण्यात आले आहेत.  शिक्षण विभागाचा मूळ हेतू निश्चितच योग्य आहे. विद्यार्थ्यांवर शारीरिक अथवा मानसिक ताणतणाव येऊ नये. त्यांचा अपमान होऊ नये, हा उद्देश महत्त्वाचा आहे. मात्र नियमांची अंमलबजावणी करताना वास्तव परिस्थितीचाही विचार होणे आवश्यक आहे. शिक्षकांनी कोणत्याही विद्यार्थ्यांची दुसऱ्या विद्यार्थ्यांशी तुलना करू नये. तो हुशार आहे आणि तू मष्ठ आहेस, तुला काहीच येत नाही, अशा शब्दांनी विद्यार्थ्यांचा अपमान करणे घातक आहे. अशा अपमानामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर विपरीत परिणाम होतो आणि त्यांच्या मनात शिक्षणाबद्दल भीती निर्माण होते.

Oplus_131072

शिक्षक हे केवळ अभ्यास शिकवणारे नसून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवणारे शिल्पकार असतात. प्रत्येक शिक्षकाला आपला विद्यार्थी शिस्तबद्ध, प्रगतिशील आणि यशस्वी व्हावा, असे मनापासून वाटत असते. त्यामुळेच ते शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात. मात्र शिस्त लावताना अनावधानाने कठोर शिक्षेचे स्वरूप येऊ नये, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. शाळेतील अनेक वर्गामध्ये मोठ्याप्रमाणात विद्यार्थी असतात. इतक्या मोठ्या संख्येतील मुलांना सांभाळणे हे सोपे काम नाही. मुलं त्यांच्या वयोमानानुसार खोडकरपणा, मस्ती आणि शरारती वर्तन करत असतात. अशा परिस्थितीत वर्गातील शिस्त राखणे हे शिक्षकांसाठी खऱ्या अथनि तारेवरची कसरत ठरते, असेही डॉ. तांबे यांनी नमूद केले.

Oplus_131072

मुलांना मारहाण करणे चुकीचेच. पट्टीने मारणे, बेदम मारणे किंवा जाणीवपूर्वक शारीरिक इजा पोहोचवणे हे अजिबात स्वीकारार्ह नाही. मात्र शिस्त लावताना एखाद्या क्षणी घडलेलो अनवधानाची चूक आणि जाणीवपूर्वक केलेली मारहाण यामध्ये फरक केला गेला पाहिजे. प्रत्येक प्रकरणात शिक्षकाला थेट दोषी ठरवणे योग्य नाही. सध्या अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे घटनांची वस्तुनिष्ठ तपासणी होऊ शकते. या तंत्रज्ञानाचा वापर करून सत्य परिस्थिती समोर आणणे शक्य आहे.

Oplus_131072

तसेच काही पालकांनी छोट्या घटनांचा गैरफायदा घेऊन शिक्षकांवर दबाव टाकू नये, असे आवाहनही डॉ. तांबे यांनी केले.

Oplus_131072

एकीकडे विद्यार्थ्यांचे हक्क आणि सुरक्षितता जपणे गरजेचे आहे, तर दुसरीकडे शिक्षकांचा आत्मसन्मान, कामाचा ताण आणि मानसिक तणाव यांचाही समतोल राखला गेला पाहिजे. शिक्षक आणि पालक यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण झाले, तरच शालेय शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम होईल, असे मत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *