अहिल्यानगरमध्ये महायुतीची ऐतिहासिक झेप; सत्ता एकहाती येण्याचे स्पष्ट संकेत
अहिल्यानगर । झुंझार न्यूज
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीने शहराच्या राजकारणात मोठा धमाका केला आहे. नगर परिषद आणि नगर पंचायतींमध्ये विजयाची परंपरा राखणाऱ्या भाजपने आता महापालिकेतही विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, महापालिकेत महायुतीची एकहाती सत्ता येण्याचे संकेत मिळत आहेत.
विखे-जगताप पॅटर्नचा करिश्मा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरमध्ये महायुतीने भक्कम मोर्चेबांधणी केली होती. या रणनीतीला सुरुवातीलाच मोठे यश मिळाले आहे. शहरातील प्रभाग रचनेत आणि उमेदवार निवडीत पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी दाखवलेल्या समन्वयामुळे विरोधकांचे अक्षरशः धाबे दणाणले आहेत. या ‘विखे-जगताप एक्स्प्रेस’ने निवडणुकीपूर्वीच विजयाचा मार्ग सुकर केल्याचे बोलले जात आहे.
हे आहेत बिनविरोध निवडून आलेले ‘विजेते’
निवडणूक प्रक्रियेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यावर महायुतीच्या पाच जागा बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये: प्रभाग क्रमांक ७: पुष्पा अनिल बोरुडे (भाजप) प्रभाग क्रमांक ६: करण कराळे (भाजप) प्रभाग क्रमांक ६: सोनाबाई शिंदे (भाजप) प्रभाग क्रमांक ८: कुमार वाकळे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) प्रभाग क्रमांक १४: प्रकाश भागानगरे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) या पाचही उमेदवारांच्या विजयामुळे महायुतीने मतदानापूर्वीच मोठी आघाडी घेतली आहे.
‘भूतो न भविष्यती’ घटना
अहिल्यानगर महापालिकेच्या इतिहासात एकाच वेळी पाच नगरसेवक बिनविरोध निवडून येणे ही घटना ‘भूतो न भविष्यती’ मानली जात आहे. निवडणूकपूर्व टप्प्यातच मिळालेले हे यश महायुतीच्या संघटनात्मक ताकदीचा आणि विरोधकांच्या कमकुवत रणनीतीचा पुरावा मानला जात आहे. या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ‘अबकी बार, महायुती सरकार’ अशा घोषणांनी शहर दुमदुमले आहे.
डॉ. सुजय विखेंबद्दलची सहानुभूती ठरली निर्णायक
खासदारकीच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला, तरी डॉ. सुजय विखे पाटील यांनी शहराच्या विकासाचा ध्यास सोडला नाही. पराभवानंतरही त्यांनी सातत्याने जनसंपर्क ठेवला, प्रलंबित विकासकामांसाठी निधी आणला आणि नागरिकांच्या अडीअडचणीत धावून गेले. त्यांच्या या सक्रियतेमुळे शहरात त्यांच्याबद्दल मोठी सहानुभूती निर्माण झाली आहे. खासदार असताना त्यांनी केलेल्या कामांचा ठसा आजही जनमानसात उमटलेला आहे, ज्याचा थेट फायदा या निवडणुकीत महायुतीला मिळताना दिसत आहे.
विकासाचा विश्वासार्ह चेहरा
अहिल्यानगर शहराचा सर्वांगीण विकास केवळ सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप ही जोडीच करू शकते, असा विश्वास सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे.
या दोघांच्या नेतृत्वावर जनतेने टाकलेला विश्वास या बिनविरोध निवडीतून अधोरेखित झाला आहे.
निकालाबाबत ठाम विश्वास
येत्या १५ तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असला, तरी शहरात आतापासूनच महायुतीच्या विजयाची खात्री व्यक्त केली जात आहे. “बिनविरोध विजयाने आम्ही विजयाचा श्रीगणेशा केला आहे, १५ तारखेला महापालिकेवर महायुतीचाच भगवा आणि घड्याळ दिसेल,” असा ठाम विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
एकूणच, अहिल्यानगर महापालिकेत निवडणुकीआधीच सुसाट सुटलेली ‘विखे-जगताप एक्स्प्रेस’ विरोधकांना धोबीपछाड देण्यात यशस्वी ठरली आहे.