संगमनेर । झुंझार न्यूज

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांना महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, सध्या राज्यातील राजकारणाचे जे विदारक चित्र समोर येत आहे, ते अत्यंत चिंताजनक आहे. निवडणुकीच्या तिकिटावरून होणारा गोंधळ, निष्ठावंतांवर होणारा अन्याय आणि सत्तेसाठी सुरू असलेली जीवघेणी मारामारी हा कोणता धुमाकूळ राज्यात सुरू आहे? महाराष्ट्र नेमका कुठे चालला आहे?” अशा शब्दांत राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली.

 

 

संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नवीन पदाधिकाऱ्यांच्या पदभार ग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, जर्मनीच्या माजी खासदार क्लोडिया नॉलटे, गिरीश मालपाणी, डॉ. जयश्रीताई थोरात, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड यांसह अनेक मान्यवर आणि नगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.


बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, “राजकारण हे सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी असते, पण सध्या केवळ सत्तेसाठी चढाओढ सुरू आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने जे चित्र दिसत आहे, तसे यापूर्वी कधीही नव्हते. संगमनेरची राजकीय परंपरा नेहमीच सुसंस्कृत राहिली आहे आणि ती आपल्याला जपायची आहे. आपण कोणाचाही द्वेष करत नाही, पण विकासाच्या आड येणाऱ्या प्रवृत्तींना जनताच उत्तर देते.” त्यांनी संगमनेर बस स्थानकाच्या विद्रुपीकरणावरूनही विरोधकांचा समाचार घेतला. “आम्हाला ओळखा’ म्हणत काहींनी फ्लेक्स लावून बस स्थानकाचे सौंदर्य खराब केले, ही आपली संस्कृती नाही,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

 

 

 

नगरपालिकेचा कारभार आता ‘ऑनलाईन’

पारदर्शकतेवर आमदार सत्यजित तांबे यांचा भर
आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी शहराच्या विकासाचा नवा रोडमॅप मांडला. ते म्हणाले की, “नगरपालिकेचे उत्पन्न केवळ १५ कोटी आहे, मात्र खर्च १६५ कोटींच्या घरात जातो. हा निधी राज्य आणि केंद्राच्या योजनांतून आणून आम्ही शहराचा विकास करत आहोत. आता नगरपालिकेचे ऑडिट आणि बॅलन्स शीट वेबसाईटवर टाकले जाईल, जेणेकरून कारभारात पारदर्शकता येईल. प्रत्येक नगरसेवकाच्या कामाचे मूल्यमापन जनतेला घरपोच कळवले जाईल.” शहरात पार्किंगची समस्या आणि अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.


उद्योगपती राजेश मालपाणी यांनी थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरने आपली संस्कृती जपल्याचे सांगत डॉ. मैथिलीताई तांबे यांच्या कामाचे कौतुक केले. जर्मनीच्या माजी खासदार क्लोडिया नॉलटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रमिला अभंग यांनी केले. या सोहळ्याला संगमनेर शहरातील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

आम्हाला ओळखा’ म्हणणाऱ्यांना टोला


“बस स्थानकावर स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी काहींनी वर्षभर फ्लेक्स लावले. काही फ्लेक्स उलटे झाले तरी ते काढले गेले नाहीत. स्वच्छतेचा केवळ इव्हेंट न करता ती संस्कृती म्हणून जपली पाहिजे,” असा सल्ला थोरात यांनी दिला.

संगमनेरचा ‘ट्रेंड’ राज्यभर


“संगमनेर नगरपालिका जे उपक्रम राबवते, तो राज्यासाठी ट्रेंड ठरतो. येथील स्वच्छता अभियान आणि विकासकामे राज्यभर आदर्श ठरत आहेत,” असे आमदार सत्यजित तांबे यांनी अभिमानाने नमूद केले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *