शिवशक्ती वाघे मंडळाचा ‘जागरण-गोंधळ’ ठरला मुख्य आकर्षण
पानोडी । झुंझार न्यूज
.
संगमनेर तालुक्यातील पानोडी (काळूबाई ओढा) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री इच्छापूर्ती काळूबाई देवीचा वार्षिक यात्रा उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या उत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांनी अवघी पंचक्रोशी दुमदुमली होती.

यात्रेचे मुख्य आकर्षण गणेश नगर येथील प्रसिद्ध ‘शिवशक्ती वाघे मंडळ’ यांचा जागरण-गोंधळाचा कार्यक्रम ठरला. राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित असलेल्या या मंडळाचे प्रमुख बाळासाहेब त्रिंबक राहिज व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या दर्जेदार सादरीकरणातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि काळूबाई देवीची महती उलगडली. या लोककलेचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
इच्छापूर्ती काळूबाई ही नवसाला पावणारी आणि मनातील इच्छा पूर्ण करणारी ‘जागृत देवस्थान’ म्हणून प्रसिद्ध आहे. पंचक्रोशीतील हे एकमेव जागृत ठिकाण असल्याने भाविकांची येथे मोठी श्रद्धा आहे. यात्रेनिमित्त आयोजित महाप्रसादाचा सुमारे १३०० हून अधिक भाविकांनी लाभ घेतला. शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसर काळूबाईच्या जयघोषाने हर्षोल्हासाने भरून गेला होता.

या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने भाऊसाहेब मांढरे, रामनाथ पवार, सुनील मांढरे, विक्रम राजे थोरात, प्रवीण खेडकर, जगन्नाथ धानापुने, प्रदीप मांढरे, दत्ता मांढरे, गजानन मांढरे, सोपान पवार, बंटी नागरे, प्रमोद खेडकर, दत्ता धानापुने, भरत पवार, बंडू मांढरे, ज्ञानदेव मांढरे, अण्णा मुंडे, मंगेश लबडे, दत्तू नागरे, किरण नागरे, रवी नागरे, दत्तू आनंदा नागरे, भाऊसाहेब मनतोडे, विनोद घोडेकर, बाळासाहेब चव्हाण, जालिंदर तळेकर, किसन जाधव, संजय पाबळ, संदीप कराड, वनिता जाधव, शोभा गायकवाड, प्रतिभा पवार आदीसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते .

या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी महिला बचत गट भगिनी, वेताळ बाबा मित्र मंडळ आणि पानोडी भजनी मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. भाविक भक्तांच्या सहकार्यामुळे हा सोहळा अत्यंत देखणा झाला. भविष्यात या यात्रेचे स्वरूप अधिक व्यापक करून ती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचा मानस मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
पानोडी आणि परिसरातील आबालवृद्धांनी या धार्मिक कार्यक्रमाचा, दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेऊन देवीचे आशीर्वाद घेतले.

