विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

Oplus_131072

आश्वी । झुंझार न्यूज

राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या रयत संकुलात थोर स्वातंत्र्य सेनानी, माजी आमदार कॉ. पी. बी. कडू पाटील आणि मातोश्री शांताबाई कडू पाटील यांचा स्मृतिदिन सोहळा १९ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला.

 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोले येथील अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मधुकर नवले हे होते तर माजी खासदार प्रसादराव तनपुरे आणि अर्जुनराव राजळे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील, कॉ. पी. बी. कडू पाटील व मातोश्री शांताबाई कडू पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रयत संकुलाचे प्राचार्य सिताराम गारुडकर यांनी सर्वांचे स्वागत केले .

 

प्रास्ताविक करताना स्कूल कमिटी सदस्य किरण कडू पाटील यांनी स्मृतिदिन सोहळ्यामागची भूमिका स्पष्ट केली. रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेच्या १०० वर्षांच्या पार्श्वभूमीवर या विचारसरणीचे देशाच्या जडणघडणीतील महत्त्व विशद केले. यावेळी आप्पांच्या (कॉ. पी. बी. कडू पाटील) अनेक जुन्या सहकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या सोहळ्यात ‘मातोश्री शांताबाई कडू पाटील आदर्श मुख्याध्यापिका’ पुरस्काराने श्रीमती सुमनताई अशोकराव ताकटे यांना, तर सामाजिक कार्यासाठी श्रीमती भागीरथीबाई बाबुराव थोरात यांना सन्मानित करण्यात आले. तसेच निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. कडू पाटील फाउंडेशनला देणगी देणाऱ्या अशोक भुसारी, जाधव साहेब, सुहास टेकाळे व अशोकराव खटके या दात्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.


माजी खासदार प्रसादराव तनपुरे आपल्या भाषणात म्हणाले की, “आप्पा हे एक ऋषितुल्य आणि सुसंस्कृत लोकनेते होते. त्यांनी चारित्र्यावर डाग लागू न देता निष्काम भावनेने समाजकारण केले. त्यांच्या कार्यात मातोश्री शांताबाईंचा मोठा वाटा होता.” त्यांनी कार्यकर्त्यांना ‘आयुष्याच्या पेटवा मशाली’ असे आवाहन करत कडू पाटील परिवाराच्या कार्याचे कौतुक केले.


तर अध्यक्षीय भाषणात मधुकर नवले यांनी सांगितले की, कॉ. पी. बी. कडू पाटील यांनी कष्टकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवर आयुष्यभर लढा दिला. अकोले तालुक्यात त्यांची प्रतिमा आजही जननायक म्हणून आहे. सहकार आणि सामाजिक चळवळीत त्यांचा आदर्श आजही प्रेरणादायी आहे.

यावेळी उद्योजक अशोकराव खटके, माजी प्राचार्य गहिनीनाथ विखे पाटील, राधाकिसन पुलाटे, शिवाजीराव भोर (माजी सचिव, रयत शिक्षण संस्था), ॲड. विजयराव कडू पाटील, पंकज कडू पाटील, योगेश चोरमुंगे, अनिलशेठ लोढा, शोभाताई कडू पाटील, सुरेखा कडू पाटील, निकिता कडू पाटील, मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे, हेमलता साबळे, विलास दिघे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास तांबे व सचिन पलघडमल यांनी केले, तर आभार कॉ. कारभारी पाटील उगले यांनी मानले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *