आश्वी । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील जोर्वे-रहिमपूर रस्त्यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. कोंबडी खताच्या गोण्या घेऊन जाणारा एक भरधाव आयशर टेम्पो नियंत्रण सुटल्याने थेट विहिरीत जाऊन कोसळला. सुदैवाने, हा टेम्पो जवळच असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला न धडकल्यामुळे मोठी वीज दुर्घटना टळली. या अपघातात टेम्पोमधील चालक आणि इतर तीन प्रवासी असे एकूण चार जण बालंबाल बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सटाणा तालुक्यातील देवळाभोर येथील आयशर टेम्पो (क्रमांक एम.एच. ४१, ए.व्ही. ६१८३) कोंबडी खताच्या बॅगा घेऊन संगमनेर तालुक्यातील खांबा येथे आला होता. तेथे काही खताच्या बॅगा उतरवल्यानंतर, उर्वरित माल घेऊन हा टेम्पो आश्वी-रहिमपूर फाटा मार्गे संगमनेरकडे जात होता. शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास जोर्वे-रहिमपूर रस्त्यावरील जाधव वस्तीनजीक असलेल्या एका धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

नियंत्रण सुटलेला टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला घासून जात थेट जवळच असलेल्या विहिरीत जाऊन अडकला. अपघात झाला त्या ठिकाणी वीज वितरणचा मोठा ट्रान्सफॉर्मर होता. जर टेम्पो या ट्रान्सफॉर्मरला धडकला असता, तर परिसरात मोठा वीज प्रवाह उतरून भीषण जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र, ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ या म्हणीप्रमाणे ट्रान्सफॉर्मरचा धक्का न लागल्याने मोठा अनर्थ टळला.


या भीषण अपघातात विहिरीजवळ राहणारे स्थानिक नागरिक लहानू बाळाजी जाधव यांच्या घराच्या कोपऱ्याचे नुकसान झाले असून भिंत कोसळली आहे. तसेच, ज्या विहिरीत टेम्पो कोसळला, त्या दगडी बांधकाम केलेल्या विहिरीचे मोठे दगडही आत पडल्याने विहिरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. टेम्पोमध्ये बसलेले चारही जण या अपघातातून सुखरूप बाहेर पडले असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.


विशेष बाब म्हणजे, हा अपघात पहाटे तीन वाजता घडूनही टेम्पो चालक किंवा मालकाने या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली नाही. सकाळी ही घटना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर मोठी गर्दी जमली होती. माहिती देण्यास उशीर झाल्याने परिसरात विविध तर्कवितर्क लढवले जात होते. शनिवारी सायंकाळपर्यंत हा टेम्पो विहिरीतच अडकलेला होता. या घटनेमुळे जोर्वे-रहिमपूर रस्त्यावरील धोकादायक वळणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे .

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *