पानोडी । झुंझार न्यूज

 

 

 

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील हजारवाडी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री दोन बंद घरे फोडून साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि ७० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पानोडी शिवारातील हजारवाडी येथील कोळेकर वस्तीवर शुक्रवारी (१६ जानेवारी) रात्री हा प्रकार घडला. चोरट्यांनी सुरुवातीला अनिल देवराम कोळेकर (वय ३०, रा. हजारवाडी, पानोडी) यांच्या बंद घराला लक्ष्य केले. घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील पत्र्याच्या पेटीचे आणि कपाटाचे लॉक तोडून चोरट्यांनी अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोकड लंपास केली.

त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारीच राहणारे कारभारी कृष्णा कोळेकर यांच्या घराकडे वळवला. त्यांच्याही घराचे कुलूप तोडून कपाटातील ५० हजार रुपयांची रोकड आणि तीन तोळे सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शनिवारी सकाळी ७:१५ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

पोलीस तक्रारीनुसार, चोरट्यांनी एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. यामध्ये:

३ ग्रॅमची सोन्याची फॅन्सी चैन व वाटी
७ ग्रॅमचे सोन्याचे मणी आणि ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी , सोन्याचे झुबे, राजकोट रिंगा, नथ, पळी आणि सोन्याचा सर रोख ७० हजार रुपये (अनिल कोळेकर यांचे २० हजार व कारभारी कोळेकर यांचे ५० हजार).

 

घटनेची माहिती मिळताच पानोडीचे सरपंच गणपत हजारे, भारत शेवाळे यांच्यासह ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. फिर्यादी अनिल कोळेकर यांच्या तक्रारीवरून आश्वी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजि. नं. ०६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (a) आणि ३३१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे सावट आहे. “ग्रामीण भागात चोरट्यांचे धाडस वाढत असून पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक कडक करावी,” अशी मागणी सरपंच गणपत हजारे , भारत शेवाळे व ग्रामस्थांनी केली आहे.


या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए .डी. शिंदे करत आहेत.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *