अहिल्यानगर । झुंझार न्यूज

नगर तालुक्यातील शेंडी येथे विळद घाट येथील डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालयाच्या वतीने ‘ग्रामीण कृषि जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम २०२५-२६’ अंतर्गत शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात आधुनिक शेती आणि शाश्वत विकासावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले असून, परिसरातील शेतकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाच्या सरपंच सौ. प्रयागा लोंढे होत्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. भाऊसाहेब मोरे, प्रा. डॉ. दीपिका मावळे आणि सहाय्यक कृषि अधिकारी श्री. संतोष फलके उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्री. सुरेश देठे, ग्रामविकास अधिकारी अशोक बोरुडे, तलाठी भाऊसाहेब संदीप कोतकर, संतोष शिंदे, कृषि महाविद्यालयाचे प्रा. के. एस. दांगडे आणि पर्यावरण मित्र गोरक्षनाथ गवते यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाश्वत शेती आणि शासकीय योजनांवर मार्गदर्शन

चर्चासत्रात प्रामुख्याने तीन महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी प्रकाश टाकला. ओला कचरा हा कचरा नसून तो खताचा एक उत्तम स्त्रोत कसा ठरू शकतो, हे प्रात्यक्षिकांसह समजावून सांगण्यात आले. तसेच, शेतीतील शाश्वतता टिकवण्यासाठी मृदा व जलसंधारणाचे महत्त्व किती मोठे आहे, यावर मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ कसा घ्यावा, याचे सविस्तर विवेचन श्री. संतोष फलके यांनी केले.

हा उपक्रम विखे पाटील कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सोमेश्वर राऊत, कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांगडे आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. पुनम ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आला.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये दर्शन बोर्डे, ओम दुसुंगे, राहुल जाधव, वेदांत मुंगसे आणि श्रीहरी सरवदे यांचा समावेश होता. शेंडी गावातील शेतकरी बांधवांनी या चर्चासत्रातून मिळालेली माहिती अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगत महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed