आश्वी । झुंझार न्यूज

 

 

रिपब्लिकन चळवळीचा बुलंद आवाज आणि केंद्रात प्रभावी नेतृत्व करणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी भारतीय राजकारणात आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. राज्यसभेवर सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून येत त्यांनी विजयाची शानदार ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर डॉ. आठवले हे ८ मार्च रोजी शिर्डी दौऱ्यावर आले असता, संगमनेर तालुक्याच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत व सत्कार करण्यात आला.

डॉ. रामदास आठवले यांची संसदेतील कामगिरी आणि उपेक्षितांच्या प्रश्नांवर असणारी त्यांची पकड यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. त्यांच्या या विजयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. आपल्या हॅट्ट्रिकनंतर डॉ. आठवले यांनी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावली.
यावेळी संगमनेर तालुक्यातील आरपीआय कार्यकर्त्यांनी एकत्र येत त्यांचे स्वागत केले.

डॉ. आठवले यांचे स्वागत करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. “आठवले साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी डॉ. आठवले यांना पुष्पहार घालून आणि शाल-श्रीफळ देऊन सन्मानित केले.

या सत्कार सोहळ्याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे संगमनेर तालुकाध्यक्ष आशिक शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, जनार्दन साळवे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष आशिक शेळके म्हणाले की, “डॉ. रामदास आठवले यांची राज्यसभेवर झालेली ही निवड सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि आंबेडकरी चळवळीचा सन्मान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक जोमाने कार्य करेल.”

डॉ. रामदास आठवले यांनीही यावेळी कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि भविष्यातही वंचितांच्या न्यायासाठी आपला लढा सुरूच राहील, अशी ग्वाही दिली. 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *