पानोडी येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमलले हास्य
संगमनेर । झुंझार न्यूज
सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक मदतीचा वारसा जपत, संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील स्व. शिवाजीराव प्रतापराव थोरात सहकारी दूध उत्पादक संस्था आणि हिंदुस्थान फिड्रस प्रा. लि. श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना टिफिन डब्बा व शालेय बॅगचे (पिशवी) वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
हिंदुस्थान फिड्रस प्रा. लि. ही कंपनी गेल्या ४० वर्षांपासून दूध उत्पादकांना गुणवत्तापूर्ण पशुखाद्य पुरविण्याचे कार्य अविरतपणे करत आहे. सातारा, श्रीरामपूर, बारामती आणि राजस्थान अशा चार प्रमुख केंद्रांमधून या पशुखाद्याचा पुरवठा केला जातो. केवळ व्यापार न करता समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाच्या भावनेतून कंपनीच्या ‘सीएआर’ (CSR) योजनेअंतर्गत दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, वृक्षारोपण, तसेच पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागातील दूध उत्पादकांना आर्थिक व वस्तूस्वरूपात मदत केली जाते.
पानोडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात थोरात विद्यालय तसेच गावठाण, हजारवाडी आणि ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना टिफिन डब्बा आणि पिशव्यांचे वाटप करण्यात आले. आकर्षक टिफिन डब्बा हातात पडताच लहानग्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि कल्पक हास्य दिसून आले.

या कार्यक्रमाप्रसंगी स्कूल कमिटीचे अध्यक्ष विनायकराव थोरात, दूध संस्थेचे चेअरमन गणेश जाधव, शरदराव जाधव, विठ्ठल घोडेकर, माणिकराव पाबळ , बाळासाहेब सानप , पत्रकार राजेश गायकवाड आदी उपस्थित होते . तसेच शैक्षणिक क्षेत्रातील थोरात विद्यालयाचे मुख्याध्यापक पोपट सोनवणे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी गोडसे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कंपनीच्या वतीने मार्केटिंग ऑफिसर रवींद्र पवार, सेल्स ऑफिसर सचिन आदिक, अक्षय ट्रेडर्सचे संचालक विजय गोसावी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव एकनाथ खेडकर, मारुती पाबळ, अनिकेत वाकचौरे यांच्यासह शिक्षक सहकार्य केले.

शासकीय शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना अशा प्रकारे कॉर्पोरेट कंपन्या आणि स्थानिक संस्थांनी मदत केल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाला बळ देण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
