आठ मार्च जागतिक महिला दिन व दहा मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या रयत शैक्षणिक संकुल ,सात्रळ ,तालुका राहुरी ,जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अश्विनी जाधव, सलमा पठाण, रचना फुलारी, पुनम भालेराव, विद्या गोडगे ,सीमा नवले या महिला शिक्षिकांचा स्मृतिचिन्ह व पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिल्या नगर जिल्हाध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्या पत्नी सौ शोभाताई अरुण कडू पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप उपस्थित होते.
रयत शैक्षणिक संकुल सात्रळ येथील कन्या विद्यालय, मुले विभाग, कनिष्ठ महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नियमित अध्यापनाव्यतिरिक्त शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, संस्थेचा गुरुकुल विभाग, नीट, सीईटी परीक्षा मार्गदर्शन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) इत्यादी विषयी तीनही विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षिकांचा सन्मानचिन्ह व परिवर्तनवादी विचारांची पुस्तके देऊन मधुकर अनाप यांचे तर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांनी अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धा यापासून स्वतः, विद्यार्थी विद्यार्थिनी व समाजामध्ये प्रबोधन करून जागृती करावी असे आव्हान केले.
अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्या मध्ये महिलांचे प्रमाण जास्त असते म्हणून समाजातील एक जबाबदार घटक म्हणून महिला शिक्षिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन मधुकर अनाप यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात सौ शोभाताई अरुण कडू पाटील यांनी महिलांनी अंधश्रद्धेच्या आणि अनिष्ट रूढी परंपरेच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
मुलींनी उच्चशिक्षित होऊन स्वतः सक्षम पणे कुटुंब व समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच धार्मिक व जातीय सलोखा राखण्याचे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण विषयी प्रबोधन केले.
मुख्याध्यापिका सौ विद्या ब्राह्मणे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी प्राचार्य सिताराम गारुडकर , परिवेक्षिका साबळे मॅडम, तीनही विभागातील शिक्षक शिक्षिका, विविध क्षेत्रातील मान्यवर महिला विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहोनी मॅडम व पठाण मॅडम यांनी केले तर श्रीमती अश्विनी जाधव यांनी आभार मानले.