सात्रळ महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन

निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

 

सात्रळ । झुंझार न्यूज

 

 

सात्रळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सात्रळ येथे “अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याच अनुषंगाने महाविद्यालय स्तरावर निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांनी दिली.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गीताने झाली. प्रा. एस. बी. राजभोज यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. दीपप्रज्वलन समारंभ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. प्रतिक हरिभजन शिंदे (शिक्षण प्रसारक संस्था, श्री ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय, संगमनेर) उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे, समन्वयक डॉ. बी. एन. नवले, प्रो. डॉ. आर. डी. बोरसे, प्रा. डी. एन. घाणे, डॉ. एकनाथ निर्मळ, डॉ. गंगाराम वडितके, डॉ. सुषमा उंडे, डॉ. प्रतिभा विखे, प्रा. सुधीर वाघे, अ‍ॅड. अनिल गागरे, श्री. महेंद्र तांबे, श्री. विकास दिघे तसेच विविध विषयांचे विभागप्रमुख व सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.


यावेळी डॉ. प्रतिक शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या बहुआयामी कार्याचा इतिहास सविस्तरपणे उलगडून सांगितला. त्यांनी अहिल्यादेवींच्या समाजकारण, प्रशासन, अर्थकारण तसेच धार्मिक कार्यातील दूरदृष्टीपूर्ण योगदानावर प्रकाश टाकला. राज्यकारभारात कुशल नेतृत्व करताना त्यांनी विविध प्रशिक्षण उपक्रम राबविले, कौशल्यविकासाला चालना देणारे विभाग निर्माण केले तसेच अनेक मंदिरे व स्थापत्यकलेची उत्कृष्ट उदाहरणे उभी केली. त्यांच्या कारकिर्दीत न्यायव्यवस्था कुशल, पारदर्शक व प्रामाणिक होती, त्यामुळे प्रजेचा प्रशासनावर दृढ विश्वास निर्माण झाला. पराक्रम व सुयोग्य प्रशासनामुळे त्यांनी ‘अटकपार झेंडे’ लावल्याप्रमाणे कीर्ती मिळवली. आजच्या महिला सबलीकरणाच्या संकल्पनेतही अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी ठरते, असे सांगत डॉ. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजसेवेची भावना जोपासण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे यांनी विद्यार्थ्यांना अशा व्याख्यानांमधून इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांची कार्ये जाणून घेण्याची संधी मिळते, असे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. दीप्ती आगरकर यांनी केले. डॉ. विजय शिंदे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *