झरेकाठी । झुंझार न्यूज 

 

 

स्त्री समाजाकडे डोळसपणे पाहत असते. भोवतालचे सामाजिक प्रश्न समजून, सोडविण्यासाठी उच्चशिक्षित स्त्री पुढे येत आहे. राष्ट्राची सर्वांगीण प्रगती स्त्री व पुरुष या दोन चाकावर अवलंबून असते. उच्चशिक्षित स्त्री सकारात्मक सामाजिक परिवर्तनातील नांदी आहे. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या सर्वच क्षेत्रात ती आघाडीवर आहे. प्रगत व समृद्ध भारताची गुरुकिल्ली ही उच्चशिक्षित स्त्री असल्याचे मतप्रतिपादन आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवार्ड विजेत्या डॉ. सुधा कांकरिया यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ (ता. राहुरी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित ‘उच्च शिक्षणातील महिलांचा सहभाग’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. कांकरिया बोलत होत्या. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समन्वयक व उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक ॲड. श्री. आप्पासाहेब दिघे होते.

यावेळी अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक मंच मा. न्यायाधीश ॲड. मधुगिता सुखातमे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता राधाकृष्ण विखे पाटील, एआय काउन्सलर पवन वर्मा,महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या सौ. मंदाताई डुक्रे पाटील, गायत्री म्हस्के उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या,”
उच्च शिक्षणातील महिलांचा सहभाग हा समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. गेल्या काही दशकांमध्ये महिलांच्या शिक्षणात मोठी वाढ झाली असून अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.

भारतामध्ये महिला उच्च शिक्षणाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये मुलींचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान आणि कला या क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय झाला आहे. स्त्री-पुरुष समानता ही वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्तरावर सारखीच मिळायला हवी. समर्थ देश घडवायला वैश्विक संसाररथाची दोन्ही चाके मजबूत असावी लागतात.

बीजभाषण करताना ॲड. मधुगिता सुखातमे म्हणाल्या,”अलीकडची कुटुंब पद्धती डोळसपणे समजून घ्या. प्राचीन सावित्री ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हा अक्षर प्रवास उलगडून दाखवताना ‘ज्ञानयज्ञाचे मेंहदी वाटप’ उदाहरणासह सांगितले. प्राचीन काळात स्त्री-पुरुष भेदभाव नव्हता. मग दररोज येणारे घटस्फोटाचे अर्ज हे कशाचे प्रतीक आहे. कागदी शिक्षणाने आम्हाला काय दिले ? खरेतर अनौपचारिक शिक्षण हे घरापासूनच सुरू होते. संविधानाने दिलेल्या सोयींचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे.” शेवटी त्यांनी श्रोत्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला.

अध्यक्षीय भाषण करताना भाषण करताना संस्थेचे ज्येष्ठ संचालक ॲड. श्री. आप्पासाहेब दिघे म्हणाले,” महिलांचा उच्च शिक्षणातील सहभाग वाढणे म्हणजे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. शिक्षित महिला समाजात सकारात्मक बदल घडवू शकतात आणि भविष्यातील पिढीला अधिक सक्षम बनवू शकतात. प्रवरा शिक्षण संस्थेने ग्रामीण भागात अद्ययावत भौतिक सुविधांनी युक्त भव्य शैक्षणिक संकुल उभा करून शेतकरी, गरीब व होतकरू मुलांसाठी, विशेषत: ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची सोय निर्माण केली. शैक्षणिक वटवृक्षासमान विस्तीर्ण झालेले हे महान कार्य पद्मश्री व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी उभा केले. आज तेच शाश्वत कार्य संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेतृत्वाखाली गतिमान होत आहे. वर्तमानकालीन समाज व्यवस्थेचे भान असणाऱ्या मा. डॉ. सुस्मिता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या आव्हानांना तोंड देत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था सक्षमपणे पुढे वाटचाल करत आहे.

डॉ. कांकरिया यांनी महिला सन्मान व्यक्त करणारी सामूहिक प्रतिज्ञा सर्वांकडून म्हणून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीप्ती आगरकर व डॉ. अनंत केदार यांनी केले. आभार डॉ. राम तांबे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. रामदास बोरसे, प्रा. दिनकर घाणे, डॉ. सोमनाथ बोरुडे, डॉ. भाऊसाहेब नवले, श्री. राजनाथ गोडगे तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *