बेल्हे । झुंझार न्यूज
आजच्या धावपळीच्या युगात अनेक तरुण शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी शहराकडे अथवा परदेशात स्थायिक होतात. मात्र, यश मिळाल्यानंतरही आपली माती आणि आपली पहिली शाळा यांना न विसरणारे मोजकेच असतात. याचाच प्रत्यय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबेवाडी येथे आला. शाळेचे माजी विद्यार्थी श्री. ओंकार संतोष कुंजीर यांनी परदेशात कार्यरत असतानाही आपल्या प्राथमिक शाळेप्रती असलेली सामाजिक जाणीव जपली असून, त्यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दप्तरांचे वाटप करण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या प्रगतीला हातभार लागावा, या उदात्त हेतूने ओंकार कुंजीर यांनी या मदतीचा हात पुढे केला आहे. नवे कोरे दप्तर हातात पडताच चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहायला मिळाला, तो खरोखरच कौतुकास्पद होता. “माजी विद्यार्थी जेव्हा शाळेकडे वळून पाहतात, तेव्हा शाळेचे नाव खऱ्या अर्थाने मोठे होते,” अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.

या स्तुत्य उपक्रमासाठी आयोजित कार्यक्रमाला गावातील आणि परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यामध्ये श्री. संतोष कुंजीर, सौ. उज्ज्वला कुंजीर, कु. प्रियंका कुंजीर यांसह तांबेवाडीचे सरपंच श्री. दशरथ कुंजीर, पोलीस पाटील श्री. धोंडीभाऊ कुंजीर, श्री. जर्नादन सैद, स्वामी समर्थ दूध डेअरीचे चेअरमन श्री. सबाजी हाडवळे, व्हाईस चेअरमन श्री. विकास तांबे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. रविंद्र तांबे आणि ज्येष्ठ नागरिक श्री. भाऊसाहेब बांगर आदि मान्यवर उपस्थित होते.
आपल्या कर्तृत्वाने परदेशात झेंडा फडकवणाऱ्या ओंकार कुंजीर यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबेवाडी तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांच्या वतीने कुंजीर परिवार आणि ओंकार कुंजीर यांचे विशेष आभार मानण्यात आले.

“आपल्या शाळेतून शिकून गेलेला विद्यार्थी जेव्हा अशा प्रकारे शाळेची आठवण ठेवतो, तेव्हा शिक्षक म्हणून आम्हाला आमची शिदोरी सार्थकी लागल्याचे समाधान मिळते,” अशी भावना शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमाची संपूर्ण गावात चर्चा असून ओंकार कुंजीर यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Post Views: 631

