बाजारपेठेतील रस्त्यासाठी निधी दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचा नागरी सत्कार
झरेकाठी । झुंझार न्यूज
सात्रळ (ता. राहुरी) परिसरातील विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सात्रळच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. प्रवरानगर येथे आयोजित ‘जनता दरबारात’ विखे पाटील यांचा सात्रळ बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या कामासाठी निधी दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला, तसेच गावातील इतर जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत त्यांना साकडे घालण्यात आले.
सात्रळ येथील बाजारपेठेतून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती. नामदार विखे पाटील यांनी या रस्त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिल्याने आता हा रस्ता प्रशस्त आणि सुसज्ज झाला आहे. या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रवरा सहकारी बँकेचे संचालक वसंत डुक्रे, माजी संचालक रमेश पन्हाळे, ज्येष्ठ कार्यकर्ते जे. पी. जोर्वेकर यांच्यासह ग्रामस्थांनी विखे पाटलांचा सत्कार केला.
सत्कारानंतर सात्रळकरांनी गावातील महत्त्वाच्या समस्यांचा पाढा विखे पाटलांसमोर वाचला. सात्रळ परिसरासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात आले आहे, मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे केंद्र बंद अवस्थेत आहे. हे केंद्र तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेली पाणी योजनेची कामे रखडलेली असून, ती तातडीने पूर्ण करण्याची विनंती करण्यात आली. सात्रळ-तांभेरे या मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांचे हाल होत असून, या रस्त्याचे कामही प्राधान्याने हाती घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
नव्याने तयार झालेल्या बाजारपेठेतील रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे आणि अत्याधुनिक सोलर पथदिवे बसवावेत, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच गावातील स्वच्छतेसाठी स्वतंत्र जागेत ‘मटण मार्केट’ उभारण्याची गरज व्यक्त केली. नामदार विखे पाटील यांनी सर्व मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि सात्रळच्या विकासासाठी आपण सकारात्मक असून सर्व प्रश्न लवकरच सोडवू, अशी ग्वाही दिली. यावेळी कोणत्याही राजकीय टीकेला थारा न देता केवळ विकासकामांवर चर्चा झाली.
बाजारपेठेतील रस्ता पूर्ण झाला असून त्याच्या उद्घाटनासाठी विखे पाटील यांनी सात्रळला यावे, असे आग्रहाचे निमंत्रण यावेळी ग्रामस्थांनी दिले. याप्रसंग प्रताप रा. कडू पाटील, अजित जोर्वेकर, प्रमोद नालकर, योगेश चोरमुंगे, मच्छिंद्र अंत्रे, बलराज पाटील, अमोल माळवे, बिपिन ताठे, सुनील नालकर, पंकज पलघडमल, संदीप रोकडे, बाळासाहेब पलघडमल व ठेकेदार वैभव तांबे उपस्थित होते.
बाजारपेठेतील रस्ता केवळ राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळेच होऊ शकला आहे. यामुळे गावाच्या वैभवात भर पडली असून, गेल्या अनेक वर्षांचा त्रास आता कमी झाला आहे. सोनगाव, सात्रळ, धानोरे या पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. ठेकेदारानेही दर्जेदार काम केले असून, या रस्त्याचे लोकार्पण विखे पाटलांच्याच हस्ते व्हावे, अशी संपूर्ण गावाची इच्छा आहे.