पुणे-नाशिक रेल्वे मार्ग आता मूळ आराखड्याप्रमाणेच?

 

संगमनेर । झुंझार न्यूज


प्रस्तावित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या आराखड्यात झालेल्या बदलामुळे संगमनेर आणि अकोले तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, हा रेल्वे मार्ग पुन्हा मूळ आराखड्याप्रमाणे किंवा पर्यायी मार्गाचा गांभीर्याने विचार करून दोन्ही तालुक्यांना न्याय द्यावा, अशा स्पष्ट सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

 

केंद्रीय रेल्वे


पुणे-नाशिक रेल्वे मार्गाबाबत निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी ना. विखे पाटील यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. या भेटीत वैष्णव यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना या प्रश्नावर मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, मुंबई येथील मंत्रालयात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीला आमदार अमोल खताळ, रेल्वे विभागाचे प्रशासकीय अधिकारी राजेश कुमार शर्मा, भुवनेश्वर कुमार, मुख्य अधिकारी विजय कुमार राय, तसेच विकास क्रांती सेना रेल्वे कृती समितीचे किशोर डोके, भगवान काळे, सतिष फापाळे, जालिंदर गागरे, संतोष शेळके आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


बैठकीत रेल्वे विभागाच्या वतीने प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. “रेल्वे मार्गात बदल करताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे संगमनेर आणि अकोले तालुक्यातील जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट आहे,” असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.


मूळ मार्गामध्ये ‘जीएमआरटी’ (GMRT) प्रकल्पाची तांत्रिक अडचण असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले होते. मात्र, लोकांची मागणी लक्षात घेऊन आणि जीएमआरटीच्या कामाला कोणतीही बाधा न पोहोचता कोणता पर्यायी मार्ग काढता येईल, याचा सकारात्मक विचार करावा, असे विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले. यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवली असून, मार्गाचे पुन्हा ‘री-अलाइनमेंट’ (नव्याने संरेखन) करण्याबाबत विचार सुरू असल्याचे आश्वस्त केले.

आमदार अमोल खताळ प्रत्यक्ष पाहणी करणार
ज्या गावांमधून मूळ मार्ग प्रस्तावित होता, त्या गावांमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्यासोबत प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. “संगमनेर आणि अकोले तालुक्याच्या विकासासाठी हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. लवकरच आम्ही केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची पुन्हा भेट घेऊन अंतिम निर्णयासाठी पाठपुरावा करणार आहोत,” असे आमदार अमोल खताळ यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीमुळे आता पुणे-नाशिक रेल्वे मार्गाबाबत संगमनेर-अकोले तालुक्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून, रेल्वे विभाग नेमका काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *