‘उभा चिरला तरी निष्ठा ठाकरेंशीच’, अरविंद सावंतांचे विरोधकांना खडेबोल

 

 

मुंबई । झुंझार न्यूज

 

 

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या फोडाफोडीच्या चर्चांनी उधाण आले आहे. ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या (शिवसेना उबाठा) आठ खासदारांमध्ये गुप्त बैठक झाल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कथित ‘ऑपरेशन टायगर’मुळे दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्या असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

गुप्त बैठकीच्या चर्चेने राजकीय वातावरण तापले

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला ताफा वळवून ठाण्यातील व्होल्टास परिसरात एका गुप्त बैठकीला हजेरी लावली. या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाजे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव हे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर ओमराजे निंबाळकर ऑनलाइन माध्यमातून जोडले गेल्याची चर्चा रंगली. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित असल्याचे समजते. या वृत्तामुळे ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट पडणार का? अशा चर्चांना पेव फुटले आहे.


‘उभा चिरला तरी मातोश्रीशीच निष्ठा’ : अरविंद सावंत आक्रमक

या कथित बैठकीत आपले नाव आल्याने ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अरविंद सावंत प्रचंड संतप्त झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व वृत्त निराधार आणि खोडसाळ असल्याचे स्पष्ट केले. सावंत म्हणाले, “मी बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे. मला कोणीही फोन केलेला नाही आणि मी ही कोणाला भेटलो नाही. मला उभा चिरला तरी माझ्या रक्तातून ‘मातोश्री’बद्दलची निष्ठाच दिसेल.”


सावंत यांनी माध्यमांना आव्हान दिले की, केवळ अफवा पसरवू नका, पुराव्यासह बातम्या द्या. “आम्ही विकली जाणारी औलाद नाही. भगवा घेऊन आलो आहोत आणि जाताना तोच पांघरून जाऊ,” अशा शब्दांत त्यांनी आपली निष्ठा व्यक्त केली. उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी ‘अखेरच्या श्वासापर्यंत सोबत राहू’ अशी ग्वाही दिली आहे.


शिकार टप्प्यात आली की ऑपरेशन’ : संजय शिरसाट यांचा सूचक इशारा

दुसरीकडे, शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी या चर्चेला अधिक हवा दिली आहे. “ऑपरेशन करणे ही आमची जुनी सवय आहे. ज्या दिवशी शिकार टार्गेटमध्ये येईल, त्या दिवशी एका दिवसात ऑपरेशन फत्ते होईल. एकनाथ शिंदे योग्य वेळी टार्गेट पाहून फायर करतात,” असे सूचक विधान शिरसाट यांनी केले. यामुळे आगामी काळात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


संजय राऊतांचे खोचक प्रत्युत्तर

शिंदे गटाच्या या दाव्यावर संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. “ऑपरेशन एकदाच केले जाते, वारंवार नाही. वारंवार ऑपरेशन केले जात असेल तर ती ‘डेड बॉडी’ असते. देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाची ‘डेड बॉडी’ केली असून आता तेच त्यांचे ऑपरेशन करत आहेत,” अशा जळजळीत शब्दांत राऊतांनी टीका केली.


दरम्यान, या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. “उबाठा खासदारांसोबत कोणतीही बैठक झालेली नाही. हे वृत्त पूर्णपणे निराधार आणि अफवा पसरवणारे आहे. गेल्या दीड वर्षांपासून अशा वावड्या उठवल्या जात आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही,” असे स्पष्टीकरण शिंदेंनी दिले आहे.

येत्या २४ तारखेला शिवसेना कुणाची? यावर अंतिम सुनावणी होणार असल्याने, दबाव निर्माण करण्यासाठी किंवा संभ्रम पसरवण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *