दौलत नाना शितोळे यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी करणार

 

सोलापूर । झुंझार न्यूज

 

महाराष्ट्रातील बहुजन, इतर मागासवर्गीय (OBC) आणि भटक्या विमुक्त प्रवर्गातील (VJNT) समाजाला सामाजिक व राजकीय स्तरावर सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी जेजुरी येथे भव्य ‘बहुजन परिवार संवाद मेळावा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित हा मेळावा १२ एप्रिल २०२६ रोजी जेजुरीतील मल्हार नाट्यगृह येथे पार पडणार आहे.


बहुजन समाजाच्या हक्कासाठी एकजूट

आज महाराष्ट्रात बहुजन आणि भटक्या विमुक्त समाजाची स्थिती अत्यंत हलाखीची आहे. शासन स्तरावर योग्य प्रतिनिधित्व मिळत नसल्याने या समाजाची मुस्कटदाबी होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांना एकाच छताखाली आणण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बहुजन समाजाचा आवाज अधिक सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.


या ऐतिहासिक मेळाव्याचे अध्यक्षपद बहुजन हृदयसम्राट आणि जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर भूषवणार आहेत. जेजुरी नगरपरिषदेचे नगरसेवक रोहितजी खोमणे हे स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार असून, जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अंकुश जाधव सर हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.


या मेळाव्याचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे राजकीय ठराव. जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिकृत ठराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यासाठी मेळाव्यात उपस्थित सर्व समाज प्रतिनिधींच्या संमतीने मंजूर केला जाईल.


पारंपारिक वेशभूषेत निघणार भव्य रॅली

कार्यक्रमाची सुरुवात अतिशय दिमाखदार पद्धतीने होणार आहे. आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जेजुरी गडावरील पुतळ्याला अभिषेक करून रॅलीची सुरुवात होईल. या रॅलीमध्ये भटक्या विमुक्त प्रवर्गातील विविध समाज बांधव आपापल्या पारंपरिक वेशभूषेत आणि वाद्यांच्या गजरात सहभागी होतील. हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत ही रॅली नंदी चौक आणि जेजुरीतील मुख्य चौकातून मार्गस्थ होत मल्हार नाट्यगृहाकडे पोहोचेल.

रॅली नाट्यगृहावर पोहोचल्यानंतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा (मल्हारी मार्तंड) याला साकडे घातले जाईल. त्यानंतर लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात येईल. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने होणार आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बहुजन समाजातील प्रमुख नेते आणि हजारो कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार असून, हा मेळावा बहुजन समाजाच्या राजकीय आणि सामाजिक भविष्यासाठी एक नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास अंकुश जाधव सर यांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *