संगमनेर तालुका रिपाइंने आश्वी पोलिसांना दिले निवेदन
आश्वी । झुंझार न्यूज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती संपूर्ण संगमनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी व्हावी, तसेच १४ एप्रिलनंतरही जयंती साजरी करण्यास कोणतेही अटी-शर्ती किंवा निर्बंध न घालता कडक पोलीस बंदोबस्त मिळावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने आश्वी पोलीस स्टेशनला सोमवारी सविस्तर निवेदन देण्यात आले.
रिपाइंचे संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष प्रभाकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली समस्त आंबेडकरी अनुयायांनी सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवळ १४ एप्रिल रोजीच नव्हे, तर सोयीनुसार बुद्ध पौर्णिमेपर्यंत विविध गावांत साजरी केली जाते. एकाच दिवशी सर्व ठिकाणी कार्यक्रम करणे शक्य नसल्याने, कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी आणि मान्यवरांच्या उपस्थितीसाठी वेगवेगळ्या तारखांना कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, पोलीस प्रशासनाकडून १४ तारखे नंतर जयंतीला परवानगी मिळणार नाही, अशा चर्चा आणि मेसेज सोशल मीडियावर फिरत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे चुकीचे निर्बंध आंबेडकरी जनतेवर लादू नयेत आणि उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष आशिष शेळके म्हणाले की, “आम्ही संविधान आणि कायदा मानणारे कार्यकर्ते आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा सोहळा असतो. अनेक ठिकाणी मिरवणुका, जाहीर सभा आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. प्रशासनाने या भावनांचा आदर करून रीतसर परवानगी द्यावी. अन्यथा, होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील.”
विशेष म्हणजे, सोमवारी आश्वी येथे आठवडे बाजार असतानाही सायंकाळच्या वेळी शेकडो भीम अनुयायांनी एकत्र येत आश्वी पोलीस स्टेशनवर धडक दिली. बाजारामुळे झालेली गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे परिसर भीममय झाला होता. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि “तुमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवून योग्य तो निर्णय घेऊ,” असे आश्वासन दिले.




यावेळी तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांच्यासह तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम, तालुका युवाध्यक्ष योगेश मुन्तोडे, जनार्दन साळवे, भारत गायकवाड, एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल बर्डे, नानासाहेब कदम, अमोल मुन्तोंडे , सनी लोंढे, सार्थक जुधारे, आकाश बर्डे, सुनील बर्डे, शुभम रोकडे, अक्षय मोरे, अशोक शेळके, साहिल शेळके, प्रतीक रोकडे, जॉन गायकवाड, अमोल कदम, केरूनाथ भोसले, संपत भोसले, राजेंद्र शिंदे, दिनकर शिंदे, चंदू कदम, योगेश खरात, अनिकेत खरात व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते











