मानवता व संपूर्ण विचार देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जगासाठी सदैव प्रेरणादायी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

संगमनेर । झुंझार न्यूज

 

जगात पद दलित आणि शोषितांच्या न्यायासाठी होणाऱ्या प्रत्येक क्रांतीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महत्त्वाचे असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवास्पद असणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले समतेचे आणि मानवतेचे विचार हे जगातील प्रत्येकासाठी सदैव प्रेरणादायी असून त्यांनी दिलेली राज्यघटना देशाला एकसंघ ठेवण्यासाठी जपा असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त डॉ.आंबेडकर पुतळा येथे अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, सुधाकरराव रोहम, उत्कर्षाताई रूपवते,भास्करराव बागुल, के.एस.गायकवाड, माणिकराव यादव, अनिकेत घुले, श्रीमती कुसुमताई माघाडे, प्रा.शशिकांत माघाडे, गौतम गायकवाड, हिरालाल पगडाल, ॲड.अमित सोनवणे,डॉ.गोसावी, विश्वासराव मुर्तडक, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा.मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आज संपूर्ण जगामध्ये अभिवादन होत आहे. हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठे व्यक्तिमत्व आहेत. देशाच्या आणि आपल्या सर्वांच्या वाटचालीमध्ये त्यांचे योगदान राहिले आहे. राज्यघटनेमुळे अनेकांना पदे मिळाली आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कठीण काळामध्ये शिक्षणाला सुरुवात केली. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज यांनी त्यांना शिक्षणासाठी मोठी मदत केली. कायदेतज्ञ, इतिहासकार, समाजतज्ञ,अर्थतज्ञ असलेल्या डॉ.आंबेडकरांमध्ये मोठी विद्वत्ता होती.

पददलीत आणि शोषितांसाठी त्यांनी लढा दिला. त्यांचे जीवन सुंदर करण्यासाठी आयुष्य समर्पित केले. कामगार, शेतकरी यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. जगामध्ये ज्या ज्या वेळेस शोषितांसाठी चळवळी होतात. त्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महत्त्वाचे असतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवता व समतेची राज्यघटना देशाला दिली. सर्वांना मताचा अधिकार मिळाला. प्रगत असलेल्या अमेरिकेमध्ये मताच्या हक्कासाठी मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर याने 1968 मोठा लढा दिला. दक्षिण आफ्रिकेमध्ये 27 वर्ष जेलमध्ये असलेल्या नेल्सन मंडेला यांनी समतेसाठी लढा दिला. या दोघांनीही महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानले होते.

देशामध्ये सध्या राज्यघटना धोक्यात आली असून न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, ईडी यासारख्या संस्था स्वायत्त आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. राज्यघटनेला जर कोणी पायदळी तुडवणार असेल तर सर्वांनी सक्षमपणे राज्यघटनेच्या विचारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.

तर मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, जगामध्ये सर्वात जास्त स्मारके ही महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आहेत. डॉ.आंबेडकर यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केले आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक त्यांचे अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्यघटना धोक्यात आली असून पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आता विचार केला पाहिजे. काही लोक राज्यघटना आणि लोकशाहीतील आत्मा काढून घेण्याचे काम करण्याचे प्रयत्न करत असून उत्सव करण्यापेक्षा विचार मनात घ्या असे आवाहन त्यांनी केले.

तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, मागील 40 वर्षापासून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अत्यंत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.थोरात,तांबे परिवार हा कायम लोकशाही मानणारा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जोपासणारा आहे. आणि यापुढेही हाच विचार जोपासला जाईल असे ते म्हणाले तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सुरुवात घरापासून करा. घरात विचार आले तर देशात येतील असे आमदार तांबे म्हणाले.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे विविध पदाधिकारी व मान्यवर कार्यकर्ते महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती व छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा होणार

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर बसस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा याचबरोबर या ठिकाणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात येणार आहे. शेजारी संविधान भिंत निर्माण केली जाणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असलेल्या जागेवरती 100 फूट तिरंगा झेंडा उभा करण्यात येणार आहे. माळीवाडा परिसरात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभा केला जाणार आहे.यासाठी नगरपालिकेच्या पहिल्याच मीटिंगमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला असून हा सर्व परिसर राष्ट्र प्रेमाचा विचार देणारा ठरेल असे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *