{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

१०-१५ तोळे सोन्यासह सव्वा दोन लाखावर डल्ला !

 

 

आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर आणि आश्वी बुद्रुक परिसरात शनिवारी पहाटे सशस्त्र दरोडेखोरांनी मोठा धुमाकूळ घातला. एकाच रात्री चार वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करून चोरट्यांनी अंदाजे १० ते १५ तोळे सोने आणि सव्वा दोन लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. या घटनेत दरोडेखोरांनी एका वृद्ध महिलेच्या कानातील दागिने जबरदस्तीने ओरबाडल्याने त्यांचे कान फाटून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या भीषण प्रकारामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे १२:३० वाजेच्या सुमारास ७ ते ८ सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने आपला मोर्चा उंबरी बाळापूर परिसराकडे वळवला. चोरट्यांनी प्रथम शेडगाव-उंबरी बाळापूर नवीन पुलालगत असलेल्या किसन खेमनर यांच्या ‘हॉटेल बानाई’ला लक्ष्य केले. मात्र, तेथे रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू हाती न लागल्याने चोरट्यांनी चक्क हॉटेलमधील खाद्यपदार्थांवर ताव मारला आणि तिथून काढता पाय घेतला.

त्यानंतर या टोळीने जवळच असलेल्या भाऊसाहेब खेमनर यांच्या वस्तीवर धाड टाकली. चोरट्यांनी घरात शिरून सर्व सामानाची उचकापाचक केली. खेमनर कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी येथून अंदाजे २ तोळे सोने, २५ ते ३० हजार रुपयांची रोकड आणि एक मोबाईल चोरला. घराबाहेर आवाज झाल्याने हौशीराम (पप्पू) खेमनर हे बाहेर आले असता, दरोडेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक करत तिथून पळ काढला.

रात्री दीड वाजेच्या सुमारास ही टोळी प्रवरा कालव्यालगत राहणाऱ्या चांगदेव उंबरकर यांच्या घरी पोहोचली. घराचा मागील दरवाजा तोडून ३ ते ४ दरोडेखोर आत शिरले. त्यांनी उंबरकर कुटुंबातील तरुणांच्या गळ्याला कुऱ्हाड आणि कती लावून जीवे मारण्याची धमकी दिली. उंबरकर यांच्या माहितीनुसार, चोरट्यांनी येथून १० ते १२ तोळे सोने आणि ३० हजारांची रोकड पळवली. अत्यंत क्रूरता दाखवत दरोडेखोरांनी घरातील वृद्ध महिलेच्या कानातील दागिने ओरबाडून काढले, ज्यामध्ये त्यांचे कान फाटून त्या रक्तबंबाळ झाल्या. यावेळी प्रतीक उंबरकर या तरुणाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी त्याच्यावरही दगडफेक केली.


उंबरी बाळापूरमधील घटनांनंतर चोरट्यांनी आश्वी बुद्रुक शिवारातील मच्छिंद्र होडगर यांच्या घरावर डल्ला मारला. येथे चोरट्यांनी ४ ते ५ तोळे सोने आणि १ लाख ७३ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. होडगर कुटुंबीय गाढ झोपेत असताना ही चोरी झाली असून, सकाळी उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.


या घटनेची माहिती मिळताच आश्वी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दीपक बर्डे, पोलीस हवालदार महेश आहेर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. सकाळी डॉग स्कॉडला (श्वानपथक) पाचारण करण्यात आले असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
दरम्यान, अद्याप याप्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतरच चोरीला गेलेल्या मुद्देमालाची निश्चित आकडेवारी समोर येईल. मात्र, एकाच रात्री झालेल्या या सशस्त्र हल्ल्यांमुळे संगमनेर तालुक्याच्या पुर्व भागात भीतीचे सावट पसरले असून दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.” 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed