स्थानिक युवकासह ७० जणांच्या थरारक मोहिमेनंतर मादी बिबट्या पिल्लासह जेरबंद!
आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक परिसरात गेल्या काही दिवसांपासून असलेल्या बिबट्याच्या दहशतीने शुक्रवारी उग्र रूप धारण केले. शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर बिबट्याने भीषण हल्ला चढवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर वनविभागाने युद्धपातळीवर राबवलेल्या शोधमोहिमेत एका मादी बिबट्याला तिच्या पिल्लासह जेरबंद करण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमनबाई बाळासाहेब खेमनर या शुक्रवारी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. या अनपेक्षित हल्ल्यात सुमनबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील लोक धावून आल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. जखमी सुमनबाईंना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी रुग्णालयात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि डॉक्टरांना उपचारांबाबत आवश्यक सूचना दिल्या. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वनविभागाला तात्काळ बिबट्याला जेरबंद करण्याचे कडक आदेश दिले. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी (शाखा २) सागर केदार आणि रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी व स्थानिक धाडसी तरुणांचे ७० ते ८० जणांचे पथक तैनात करण्यात आले.
शनिवारी सायंकाळच्या सुमारास केरुजी बाचकर यांच्या गट क्रमांक २३६ मधील गिनी गवताच्या शेतात बिबट्या असल्याचे निष्पन्न झाले. वनविभागाच्या पथकाने संपूर्ण परिसराला वेढा घातला. अत्यंत सावधगिरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवलेल्या या मोहिमेत अखेर एका मादी बिबट्याला तिच्या पिल्लासह जेरबंद करण्यात आले. बिबट्या पिंजऱ्यात अडकताच ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

बिबट्याच्या हल्ल्यानंतर रेबीजचा धोका टाळण्यासाठी ‘रेबीज इम्युनोग्लोब्युलिन’ (RIG) हे इंजेक्शन तातडीने मिळणे आवश्यक असते. मात्र, सध्या हे इंजेक्शन केवळ अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयातच उपलब्ध आहे. आश्वी किंवा संगमनेरपासून हे अंतर १०० ते १३० किमी असल्याने रुग्णांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे हे इंजेक्शन संगमनेरमधील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
![]()
“रेबीज इम्युनोग्लोब्युलिन (RIG) इंजेक्शन सध्या स्थानिक पातळीवर उपलब्ध नाही, ही चिंतेची बाब आहे. आगामी काळात ही सर्व आवश्यक औषधे आणि सुविधा घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करू. बाधितांना मोफत आणि जलद उपचार मिळणे हा त्यांचा हक्क आहे.”
— आमदार अमोल खताळ, संगमनेर
“विखे पाटील परिवार मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सुमनताईंवरील हल्ल्याची माहिती मिळताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः लक्ष घालून उपचारांची व्यवस्था केली. मादी बिबट जेरबंद झाल्याने दिलासा मिळाला असला तरी नागरिकांनी अजूनही सतर्क राहणे गरजेचे आहे.”



