संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

राज्यात सध्या सर्वत्र उष्णतेचा तडाखा वाढला आहे. येत्या आठ दिवसांमध्ये विविध हवामान तज्ञांनी उष्णता वाढीचा धोका सांगितला असून दुपारच्या वेळी उन्हात जाणे टाळा. याचबरोबर वाढत्या उष्णतेमुळे जास्त पाणी पिण्याबरोबर नागरिकांनी स्वतःचे आरोग्य जपा असे आवाहन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.

वाढत्या उष्णतेबाबत नागरिकांना अधिक सतर्क करताना कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे की या वर्षीचा उन्हाळा हा अत्यंत कडक आहे. मागील दोन दिवसात अहिल्यानगर जिल्ह्याचे तापमान 41.6 अंश सेल्सिअस इतके राहिले आहे. विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट येत आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे ही उष्णता वाढू शकते. म्हणून नागरिकांनी दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे टाळले पाहिजे. सध्या लग्नकार्य असल्याने अनेक जण घराबाहेर पडत आहे. याच वेळी डोक्यावर टोपी न घेता अनेक युवक तसेच बाहेर पडतात आणि त्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. अति आत्मविश्वास हा आरोग्यासाठी नेहमीच धोकादायक असतो.

उन्हाळ्याच्या या काळामध्ये सर्वांनी भरपूर पाणी प्यावे. उच्च प्रथिने युक्त अन्न टाळा तसेच शिळे अन्न खाऊ नका .लिंबू पाणी, ताक,नारळ पाणी यासारखी घरगुती पेयांचा जास्तीत जास्त वापर करा .हलके व सौम्य रंगाचे कपडे घाला. चहा कॉफी , थंड पेय घेणे टाळा.

या उपायोजनांबरोबर एखाद्याला जास्त त्रास वाटू लागल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा असे आवाहन करताना नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. धावपळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र त्यातही स्वतःच्या आरोग्यासाठी प्रत्येकाने वेळ दिलाच पाहिजे.

उष्णतेमुळे वयोवृद्ध नागरिकांनाही त्रास होऊ शकतो म्हणून अशा नागरिकांनीही शक्यतो उन्हात जाणे टाळावे, जास्तीत जास्त पाणी प्यावे असे आवाहन त्यांनी केले असून स्वस्त रहा मस्त रहा जबरदस्त रहा असा आरोग्यदायी सल्ला सर्वांना दिला आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *