आश्वी । झुंझार न्यूज
आश्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, आता थेट भरदिवसा घरफोड्या होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी (दि. २९) दाढ खुर्द शिवारात एका अल्पवयीन मुलाला शस्त्राचा धाक दाखवून रोख रकमेसह साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दाढ खुर्द शिवारातील हरणदरा परिसरात धोंडीबा जोशी यांचे निवासस्थान आहे. बुधवारी जोशी कुटुंबातील प्रौढ सदस्य नेहमीप्रमाणे शेतीच्या व इतर कामांनिमित्त घराबाहेर गेले होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास घरात फक्त एक अल्पवयीन मुलगा एकटाच होता. हीच संधी साधून चार अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजावाटे आत प्रवेश केला.
घरात अचानक अनोळखी व्यक्तींना पाहून मुलाने त्यांना हटकण्याचा व प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांपैकी एकाने त्या मुलाला जबरदस्तीने दाबून धरले आणि आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मुलगा घाबरल्याचा फायदा घेत इतर तीन चोरट्यांनी घरातील कपाटांची उचकापाचक सुरू केली. या लुटीमध्ये चोरट्यांनी कपाटात ठेवलेली अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने असा मोठा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच जोशी कुटुंबीयांनी आरडाओरडा केला आणि पोलिसांना कळवले. घटनेचे गांभीर्य ओळखून आश्वी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी हवालदार एम. एस. आहेर यांना घटनास्थळी रवाना केले. घटनेची माहिती मिळताच दाढ खुर्दचे सरपंच सतिश जोशी यांनीही घटनास्थळी धाव घेत कुटुंबाला धीर दिला.
आश्वी परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रात्रीच्या चोऱ्यांसोबतच आता चोरट्यांनी भरदिवसा वस्त्यांवर हल्ले करून लुटमार सुरू केल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा नेमका आकडा पंचनाम्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी या टोळीचा तातडीने छडा लावून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी दाढ खुर्दसह पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे.





