आश्वी बुद्रुक परिसरात भीतीचे वातावरण;

श्री शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थांचे पोलीस प्रशासनाला ‘अल्टिमेटम’

आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक आणि पंचक्रोशी परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी व दरोड्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चोरांच्या या सुळसुळाटामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या, २८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता आश्वी पोलीस स्टेशनवर धडक देऊन निवेदन देण्यात येणार आहे.

रात्रभर जागता पहारा: ‘चोर आले चोर आले’च्या घोषणांनी परिसर हादरला

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पिंप्री लौकी, अजमपूर आणि पानोडी परिसरात चोरांच्या संशयास्पद हालचालींमुळे मोठी खळबळ उडाली. “चोर आले, चोर आले” असे ओरडत ग्रामस्थांनी हातात काठ्या आणि टॉर्च घेऊन चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. भीतीपोटी अनेक गावांतील नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. विशेषतः एकांत वस्तीवर राहणारे कुटुंब, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी वर्ग सध्या प्रचंड दहशतीखाली आहे.

वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्यासाठी ‘श्री शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान’ आणि आश्वी बुद्रुक येथील समस्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस निरीक्षक, आश्वी पोलीस स्टेशन यांना देण्यात येणाऱ्या निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात येणार आहेत:

१. आश्वी बुद्रुक व परिसरात तात्काळ नियमित पोलीस गस्त (Day & Night Patrolling) वाढवावी.
२. रात्रीच्या वेळी महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी व संशयास्पद व्यक्तींची कसून चौकशी करावी.
३. संवेदनशील ठिकाणी व मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा.
४. ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी तातडीने सुरक्षा बैठक आयोजित करावी.
५. प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लावून आरोपींना तात्काळ अटक करावी.


दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ठीक ७:३० वाजता श्री शिवछत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने हे निवेदन देण्यात येणार आहे. “केवळ आश्वासन नको, तर ठोस कारवाई हवी,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आश्वी बुद्रुक आणि पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


आश्वी पोलीस आता या वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *