संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पानोडी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली असून, अबालवृद्धांसह महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात आंबेडकर वसाहत (राजवाडा) येथून करण्यात आली. येथून भीमगीतांच्या आणि डीजेच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली. निळ्या ध्वजांनी आणि ‘जय भीम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ही मिरवणूक गावातील मुख्य मार्गावरून जात गावठाणातील हनुमान मंदिर आणि शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात विसर्जित झाली.
या मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे, केवळ तरुणच नव्हे तर महिलांनीही डीजेच्या तालावर मोठ्या उत्साहात ठेका धरला होता. पारंपारिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतींनी महामानवांना अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीच्या सांगता प्रसंगी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बुद्ध वंदना घेण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महामानवांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देण्यात आला.
या सोहळ्यासाठी रिपाईचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, एकलव्य आदिवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल बर्डे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब घुगे, माजी उपसरपंच अशोक तळेकर, साहेबराव कदम , आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, उपाध्यक्ष नानासाहेब कदम , पत्रकार राजेश गायकवाड, जय कदम, लक्ष्मण कदम, गणेश कदम, अस्लम सय्यद यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पानोडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती समितीच्या वतीने कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते .