भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर’, ‘भिमशक्ती तरुण मित्र मंडळ’ आणि ‘समस्त ग्रामस्थ मालुंजे’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
या सोहळ्यानिमित्त संपूर्ण गावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ‘विघ्नहर्ता’ डीजेच्या तालावर भीमगीतांचा जयघोष करण्यात आला. विशेष म्हणजे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही गाण्यांच्या ठेक्यावर नृत्य करत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.
याप्रसंगी आमदार अमोल खताळ, सरपंच सौ. सुवर्णा संदीप घुगे, शिबलापूरचे उपसरपंच दिलीप तबाजी मुन्तोडे, रिपाईचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कदम, नानासाहेब कदम, वाय.एल. मुन्तोडे, बी.एस. मुन्तोडे, रोहिदास होशिराम मुन्तोडे, माजी सरपंच संदीप भाऊसाहेब घुगे, भाजपा तालुकाध्यक्ष गोकुळ दिघे, राजु मुन्तोडे, अशोक गायकवाड पत्रकार राजेश गायकवाड यांसह परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणुकीनंतर आमदार अमोल खताळ, आशिष शेळके, संदीप घुगे, गोकुळ दिघे व इतर मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जयंतीचे औचित्य साधून ग्रामस्थांसाठी मनोरंजनासोबतच प्रबोधनाचा वारसा जपणारा ‘अमृतवर्षा ऑर्केस्ट्रा’ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सादर झालेल्या भक्ती आणि प्रबोधनात्मक गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.
उत्सवाच्या दरम्यान करण्यात आलेल्या भव्य फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे अवघे आकाश रंगांच्या उधळणीने न्हाऊन निघाले होते. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मालुंजे आणि परिसरातील भीमअनुयायी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भिमशक्ती तरुण मित्र मंडळ आणि मालुंजे ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते, ज्यामुळे हा जयंती उत्सव तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.”