संगमनेर । झुंझार न्यूज

 

आपल्या कर्तव्यदक्षतेने प्रशासकीय सेवेत ठसा उमटवणारे, कुटुंबाचा आधारस्तंभ आणि धार्मिक विचारांचे पाईक असलेले, संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील सुपुत्र कै. भास्करराव भिकाजी सांगळे यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी दि. २६ एप्रिल २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ सांगळे कुटुंबियावरच नव्हे, तर पंचकोषी व संपूर्ण शेडगाव परिसरावर शोककळा पसरली असून, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

प्रशासकीय सेवेतील ‘आदर्श’ प्रवास

२ ऑक्टोबर १९४२ रोजी जन्मलेल्या भास्करराव यांनी आपले शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून पूर्ण केले. अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी कृषी पदविका (Agriculture Diploma) पूर्ण केली. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा या ध्येयाने ते तत्कालीन जिल्हा परिषद अहमदनगर (आताचे अहिल्यानगर) येथे कृषी विभागात रुजू झाले. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी ‘ग्रामविकास अधिकारी’ म्हणून अत्यंत निष्कलंक आणि प्रामाणिक सेवा दिली. वरिष्ठांची मर्जी संपादन करत असतानाच त्यांनी सामान्य जनतेची कामे मार्गी लावण्याला प्राधान्य दिले. त्यांच्या याच उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना ‘आदर्श ग्रामविकास अधिकारी’ पुरस्काराने सन्मानित केले होते.

 

शिक्षणाचे महत्त्व जाणणारा ‘कुटुंबवत्सल’ आधारस्तंभ

भास्करराव हे केवळ एक अधिकारी नव्हते, तर ते आपल्या कुटुंबाचे शिल्पकार होते. त्यांनी स्वतःच्या चार भावांना आणि बहिणीला केवळ सावरून धरले नाही, तर त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या विवाहासाठी आणि आयुष्यात स्थिरस्थावर होण्यासाठी भास्कररावांनी हिरीरीने पुढाकार घेतला.

 

 

शिक्षणाची ओढ त्यांच्यात उपजतच होती. त्यांनी आपला मुलगा दिलीपराव यांना त्यांनी वकील बनवले व संध्या शेडगांवचे पोलिस पाटील असण्यामागे त्याचे मोठे योगदान आहे . तर नातवाला एमबीबीएस (MBBS) शिक्षणासाठी सतत प्रोत्साहन दिले. एवढेच नव्हे तर, आपल्या बहिणीच्या मुलांच्या शिक्षणातही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्याच प्रोत्साहित व मानसिक पाठबळामुळे त्यांचा भाचा डॉ. अमोल सानप हे आज संगमनेर तालुक्यात एक नावाजलेले अस्थीरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देत आहेत.

 


कृषी आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान

सेवानिवृत्तीनंतर भास्कररावांनी स्वस्थ न बसता आपल्या मातीशी नाते जोडले. शेतीची आवड असल्याने त्यांनी आपल्या कष्टाने शेती अधिक विकसित करून तिथे ‘नंदनवन’ फुलवले. राजकारणातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला, परंतु त्यांचा उद्देश केवळ सत्ता नसून समाजसेवा हाच होता. स्थानिक विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि संस्थेच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले.

धार्मिक आणि आध्यात्मिक ओढ

भास्करराव हे अत्यंत सात्त्विक आणि धार्मिक वृत्तीचे होते. माळ जपणे, भजन करणे आणि प्रवचन ऐकणे हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यांनी अनेकवेळा तीर्थक्षेत्र आळंदी येथे दिंडी काढली आणि पंढरपूरच्या वारीतही ते नियमित सहभागी होत असत. आपल्या पत्नीसह त्यांनी ‘चारधाम’ यात्रा करून आध्यात्मिक समाधान मिळवले होते. गावोगावी प्रवास करून त्यांनी समाजात धार्मिक भावना जागृत ठेवण्याचे कार्य केले.

 

एक मनमिळावू व्यक्तिमत्व

अत्यंत शांत स्वभाव, मृदू वाणी आणि मदतीसाठी सदैव पुढे असलेला हात, ही त्यांची ओळख होती. गोरगरिबांच्या सुख-दुःखात ते नेहमी धावून जात असत. आपल्या बहिणीप्रती असलेले त्यांचे प्रेम आणि आपुलकी सर्वांसाठी आदर्श होती. त्यांच्या जाण्याने एका ‘वटवृक्षा’ची सावली हरपल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी सौ. शकुंतला भास्करराव सांगळे, मुलगा ॲड. दिलीप भास्करराव सांगळे, सून सौ. रेखा दिलीप सांगळे, नातू शुभम सांगळे, धनजंय सांगळे चार भाऊ, एक बहीण, भाचे आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 

 

दशक्रिया विधी

 

कै. भास्करराव भिकाजी सांगळे यांचा दशक्रिया विधी मंगळवार, दि. ५ मे २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता प्रवरा नदीकाठी, शेडगाव (ता. संगमनेर) येथे संपन्न होणार आहे.
ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली!

शोकाकुल

सांगळे, सानप, भाबड, कांगणे, बरके,आंधळे,फड, नागरे , आव्हाड , घुगे , मुंढे , बोंद्रे आणि दराडे परिवार.”

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed