{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

अहिल्यानगर । झुंझार न्यूज

 


जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती आणि देशाच्या अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने पाहता, येत्या खरीप हंगामामध्ये राज्यासह देशात खतांची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे संकट ओळखून केंद्र आणि राज्य सरकारने आत्तापासूनच युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केले आहे.

डॉ. नवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारताला आजही मोठ्या प्रमाणावर खतांसाठी लागणारा कच्चामाल आणि विविध खते परदेशातून आयात करावी लागतात. मात्र, सध्याची आंतरराष्ट्रीय स्थिती आणि भारतीय परकीय चलनाची गंगाजळी पाहता, आगामी काळात खतांच्या आयातीसाठी आणि अनुदानासाठी सरकार पुरेसा खर्च करू शकेल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासीयांना टंचाईचा इशारा देत शेतकऱ्यांनी खते जपून वापरावीत, असे निर्देश दिले आहेत. यावरून खत टंचाईचे सावट किती गडद आहे, याची कल्पना येते.


जर खरीप हंगामाच्या ऐनवेळी भीषण खत टंचाई निर्माण झाली, तर त्याचे दूरगामी आणि अत्यंत वाईट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतील. खतांच्या कमतरतेमुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट होईल, परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होईल. केवळ शेतकरीच नव्हे, तर अन्नधान्याचे उत्पादन घटल्यामुळे देशाची अन्नसुरक्षा धोक्यात येईल आणि बाजारपेठेत महागाईचा भडका उडण्याची भीती डॉ. नवले यांनी व्यक्त केली आहे.


या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी केवळ ‘काटकसरीचा सल्ला’ देऊन सरकारला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. सरकारने खालील बाबींवर तातडीने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी किसान सभेने केली आहे

 

१. खत निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल योग्य दरात आणि पुरेसा उपलब्ध करून द्यावा.
२. खत निर्मिती प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करून देशांतर्गत उत्पादन वाढवावे.
३. शेतकऱ्यांना खतांसाठी वणवण करावी लागू नये, यासाठी जिल्हास्तरावर नियोजन करावे.
४. खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत.

येणारा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने राजकारण बाजूला ठेवून खत टंचाईचे संकट निवारण्यासाठी कठोर प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. अजित नवले यांनी केले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed