अपघातांचे सत्र आणि धुळीच्या साम्राज्यामुळे नागरिक हैराण; काम त्वरित पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा
आश्वी । झुंझार न्यूज
शिर्डी ते पुणे या नव्यानं मंजूर झालेल्या राज्य मार्ग ६७ मधील राहाता ते पानोडी घाट पायथा या ३६ किलोमीटर रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन एक वर्ष उलटले आहे. मात्र, प्रशासकीय दिरंगाई आणि कंत्राटदाराच्या धिम्म्या गतीने हे काम प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. निष्काळजीपणाने आणि असुरक्षित पद्धतीने सुरू असलेल्या या कामामुळे परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले असून, धुळीच्या साम्राज्यामुळे ग्रामस्थ व प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शिबलापूर ते पानोडी घाट या दरम्यानचा रस्ता खोदून आता वर्ष पूर्ण होत आले आहे. मात्र, रस्ता पूर्ण करण्याऐवजी तो तसाच अर्धवट अवस्थेत ठेवल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. या खडबडीत रस्त्यामुळे दुचाकीसह छोट्या-मोठ्या गाड्यांचे सुटे भाग ढिले होऊन गाड्या ‘खिळखिळ्या’ झाल्या आहेत. “रस्ता लवकर पूर्ण करायचा नव्हता, तर मग तो खोदून का ठेवला?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
पानोडी येथील काळूबाईच्या ओढ्यावरील पुलाचे काम गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. पुलाच्या कामामुळे जो पर्यायी वळण रस्ता (डायव्हर्शन) बनवण्यात आला आहे, तो अत्यंत अरुंद आणि धोकादायक आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने अनेक गाड्या ओढ्यात आणि नाल्यात कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने अद्याप मोठी जीवितहानी झाली नसली तरी, या ठिकाणचे अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये.
रस्त्याचे काम रेंगाळल्याने परिसरात धुळीचे लोट उसळत आहेत. यामुळे रस्त्याकाठी राहणाऱ्या रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होत असून घरांमध्ये धुळीचे थर साचत आहेत. प्रवाशांना डोळ्यांचे आणि घशाचे विकार जडत आहेत. सुरक्षिततेचे कोणतेही नियम न पाळता काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकरणाची दखल घेत पानोडी आणि शिबलापूर येथील ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. “या खराब रस्त्यामुळे ज्यांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे आणि ज्यांचे अपघात झाले आहेत, त्यांना कंत्राटदाराने किंवा संबंधित विभागाने भरपाई द्यावी,” अशी मागणी करण्यात येत आहे.
तसेच, हा रस्ता तातडीने पूर्ण करावा, अन्यथा रस्ता अडवून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.